लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लहान मुलाशी होत असलेल्या भांडणाच्या कारणावरून किशोर भास्कर नन्नवरे (वय ३५, रा. कढोली, ता. एरंडोल) या तरुण शेतकऱ्याला कांताई बंधाऱ्यावर फिरायला आलेल्या अनोळखी चार तरुणांनी बेदम मारहाण करून हातावर कोयताही मारल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल झालेला आहे.
किशोर नन्नवरे हे कांताई बंधाऱ्यात आंघोळ करीत असताना तेथे त्यांचा एका लहान मुलाशी वाद झाला. त्यावेळी तेथे फिरायला आलेल्या चौघांनी नन्नवरे यांच्या हातावर उलट कोयता मारला. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. या झटापटीत त्यांचा मोबाईलही हरवला आहे. मारहाण करून हे चारही जण तेथून पळून गेले. नन्नवरे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून रात्री गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार अनिल तायडे तपास करीत आहेत.