लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आम्हाला स्टॉक रजिस्टर, खरेदी पावती, बिले उपलब्ध करून द्या, आम्ही अवघ्या सहा तासात व्हेंटिलेटर घोटाळ्याची चौकशी करून अहवाल देतो, असा दावा लोकजागृती मंचचे शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
चौकशी समितीत समाविष्ठ लोकांमध्ये एकही तज्ज्ञ नाहीत. जिल्हा शल्य चिकित्सकांवर आरोप झाल्यानंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे केवळ चौकशीचा फार्स असून, चौकशीच चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप तक्रारदार दिनेश भोळे यांनी नमूद केले. आपल्याला अद्यापही आर्थिक व्यवहारांचे विवरण का सादर केले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, चौकशीच्या आधी आरोप असणाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी शिवराम पाटील यांनी केली. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, ईश्वर मोरे, अनिल नाटेकर आदी उपस्थित होते.
उपोषण स्थगितीबाबत पोलिसांची विनंती
माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे हे १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार होते; मात्र पोलीस प्रशासनाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याबाबत विनंती करण्यात आली. अद्याप परवानगी न मिळाल्याने ते स्वातंत्र्यदिनी उपोषण करणार नसल्याची त्यांनी माहिती दिली. दरम्यान, त्यांच्या उपोषणालाही पाठिंबा राहणार असल्याचे शिवराम पाटील यांनी म्हटले आहे.