जळगाव /धुळे/ नंदुरबार : आठवड्यानंतर पुन्हा आलेल्या पावसाने चाळीसगाव व भडगाव
परिसरातील दोन गावांमध्ये पाणी शिरले होते, तर धुळे व नेर येथे अतिवृष्टी झाली तर नंदुरबार जिल्ह्यात एक तरुण वाहून गेला आहे. चांदसैली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
जळगाव
मन्याड धरण परिसरात ७ रोजीच्या मध्यरात्री आणि ८ रोजीच्या पहिल्या प्रहरी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यातच अतिवृष्टीने नांद्रे, ता. चाळीसगाव तसेच कजगाव, ता. भडगाव या दोन गावांना पाण्याचा वेढा पडला होता. तसेच या पावसामुळे अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे.
कजगाव-नागद रस्त्यावरील पुलाचा भराव पुन्हा वाहून गेला. यामुळे नागद मार्गावरील अनेक गावांचा कजगावशी संपर्क तुटला आहे. अमळनेर येथील काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतांमध्ये पाणी साचले आहे. तर चाळीसगाव येथे तितूर नदीला आठवड्यात दुसऱ्यांदा पाऊस झाला आहे. पाचोरा तालुक्यातील अम्मावती, गडद आणि तितूर नदीला पुन्हा पूर आला आहे.
धुळे
धुळे तालुक्यातील धुळे शहर, नेर, सोनगीर व खेडे येथे अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात एका दिवसात सरासरी ३९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी धुळे शहरात अतिवृष्टी झाली. एका दिवसात ८८ मि. मी. पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल धुळे तालुक्यातील नेर ८५ मि.मी., खेडे ८४ आणि सोनगीरला ८४ मि.मी. पाऊस झाला.
धुळे तालुक्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले.
नंदुरबारला तरुण वाहून गेला
जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहादा शहरातील अनेक वसाहती जलमय झाल्या आहेत, तर तळोदा-धडगाव रस्त्यावरील चांदसैली घाटात १०० मीटरपर्यंत रस्त्यावर दरड कोसळल्याने बुधवारी दिवसभर या मार्गावरील वाहतूक बंद होती. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. दरम्यान, धडगाव तालुक्यात पुराच्या पाण्यात बुडाल्याने युवकाचा मृत्यू झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मंगळवारी रात्री शहादा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १४६ मी.मी. पाऊस झाला. चांदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यात रुग्णवाहिकाही अडकल्याने रुग्ण महिलेला तिच्या पतीला खांद्यावर उपचारासाठी घेऊन जावे लागले. दरम्यान महिलेचा मृत्यू झाला, तर मनवाणी, ता. धडगाव येथील युवक मांडवी येथे आला असता त्याचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. शहादा शहरातील अनेक वस्ती व व्यापारी संकुल पाण्याखाली गेले होते. वादळी पावसामुळे शहादा तालुक्यातील ऊस, केळी व पपई या पिकांचे नुकसान झाले.