लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पावसाळ्यात शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. यामुळे वाहनधारकांनादेखील त्रास सहन करावा लागतो. तसेच रस्त्यांचीदेखील दुर्दशा होत असते. त्यामुळे येत्या काळात शहरातील नव्याने होणाऱ्या डांबरी रस्त्यांच्या कामाआधी मनपाकडून शहरातील पाणी साचणाऱ्या भागांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शहरात अमृत योजनेचे काम आता काही महिन्यांमध्ये संपणार आहे. तसेच शहरातील रस्त्यांचा कामांनादेखील मनपा प्रशासन सप्टेंबरनंतर सुरू करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत नवीन रस्ते तयार केल्यानंतर पावसाळ्यात पुन्हा पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून शहरात ज्या प्रमुख रस्ते व काही भागांमध्ये पाणी साचते अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याचा सूचना माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आता मनपाकडून हे काम लवकरच करण्यात येणार आहे. तसेच नवीन डांबरीकरण व कॉँक्रिटीकरणाचे काम करताना अशा ठिकाणी मुख्य रस्त्यापेक्षा जास्त भरावा टाकण्यात येणार आहे. म्हणजे या ठिकाणी पाणी साचण्याची समस्या निर्माण होणार नाही. ऑगस्ट महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे.