चहुत्रे, ता. पारोळा येथे तब्बल २ महिन्यांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी लहान मुले, महिला यांना वणवण भटकंती करावी लागत आहे, तर काहींना विकत पाणी घ्यावे लागत आहे.
गावासाठी पाण्याच्या तीन टाक्या असून विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत यांच्या गलथान कारभारामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अखिल भारतीय भ्रष्टचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महिला तालुकाध्यक्ष शोभा पाटील यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना याविषयी जाब विचारला असता मोटार खराब आहे. विहिरीत पाणी नाही, पाइप फुटला आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तरी गटविकास अधिकारी याबाबत दखल घेऊन चहुत्रे गावाचा पाणी प्रश्न मार्गी लावावा, यासाठी चहुत्रे गावातील महिला, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने एकत्र येत निवेदन दिले. येत्या ३-४ दिवसांत निवेदनाची दखल न घेतल्यास पंचायत समिती पारोळा येथे हंडा मोर्चा काढण्याचा इशारा महिला तालुकाध्यक्ष शोभा पाटील यांनी दिला आहे.
यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, विभागीय अध्यक्ष जितेंद्र वानखेडे, विभागीय सचिव भाऊसाहेब सोनवणे, महिला तालुकाध्यक्ष शोभा पाटील, महिला शहराध्यक्ष स्वाती शिंदे, पार्वतीबाई खैरनार, भरती भिल, दगुबाई भिल, अनिता वारुळे, मंगल गायकवाड, राधा भिल, कोकिलाबाई भिल, योगिता गायकवाड, शारदा भिल उपस्थित होते.