सर्वपक्षीय कोअर कमिटीचा निर्णय न पटल्यास भाजपचे एकला चलो
रावेर : गिरीश महाजन यांचे प्रतिपादन
रावेर : जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलच्या कोअर कमिटीचा निर्णय न पटल्यास भाजप वेळीच फारकत घेऊन ‘एकला चलो रे...’ची भूमिका घेईल आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवील, असे स्पष्ट मत आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
रावेर पंचायत समितीच्या उपसभापतीपदासाठी निवड झालेल्या धनश्री सावळे यांचा सहा महिन्यांचा कालावधी समाप्त झाला. यासाठी चक्राकार पद्धतीने विवरे गणातील भाजपच्या पं.स. सदस्य योगिता वानखेडे या अखेरच्या उमेदवार दावेदार आहेत. मात्र, भाजपने महाविकास आघाडीला सुरुंग लावत शिवसेनेच्या एकमेव सदस्य असलेल्या रूपाली कोळी यांना उपसभापतीपदाची संधी देण्याचे आश्वासित केल्याने भाजपसमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे.
त्या अनुषंगाने एकीकडे राज्यात शिवसेनेशी भाजपचा राडा सुरू असताना दुसरीकडे भाजपच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करून शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेणार काय, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, महाजन म्हणाले की, निवडणुकीसाठी अजून दोन-तीन महिने बाकी आहेत. आता कशाला निवड हवी, असा प्रश्न उपस्थित करीत आम्ही कोअर कमिटीत आजच निर्णय घेतो, असे स्पष्ट केले.