लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या चारही प्रभाग समित्यांचा सभापतींची निवड १२ रोजी होणार आहे. यासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. चारही प्रभाग समित्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी असलेले भाजपचे बहुमत आता नसल्याने भाजपने सभापती पदासाठीची आशा सोडली आहे. तर शिवसेनेतदेखील इच्छुक नसल्याने या चारही जागा आता बंडखोरांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.
प्रभाग समिती सभापतींचा कार्यकाळ १२ रोजी संपुष्टात येत आहे. यासाठी १२ रोजीच निवड होणार आहे. दरम्यान, यासाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज खरेदी करण्याची शेवटची मुदत होती. त्यानुसार एकूण २४ अर्ज सर्व राजकीय पक्षांनी घेतले आहेत. यामध्ये शिवसेनेने ८, भाजपने ८ व भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनीदेखील ८ अर्ज घेतले आहेत. गुरुवारी भाजपचे गटनेते भगत बालाणी व स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी हे अर्ज घेतले. तर शिवसेनेकडून गटनेते अनंत जोशी, नितीन बरडे यांनी तर बंडखोरांकडून ॲड.दिलीप पोकळे व चेतन सनकत यांनी आपले उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
सेना बंडखोरांना देणार संधी
शिवसेनेच्या एकूण १५ नगरसेवकांपैकी कोणताही सदस्य प्रभाग समिती सभापती होण्यास इच्छुक नसून, या चारही जागांवर शिवसेनेकडून बंडखोर नगरसेवकांना संधी देण्याची तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रभाग समिती क्रमांक ३ मध्येच भाजपला काही अंशी संधी असल्याने या प्रभागासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर इतर प्रभागांमध्ये बहूमत नसल्याने या प्रभागांमध्ये भाजपचे नगरसेवक देखील फारसे उत्सुक नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बंडखोरांकडून शुक्रवारी आपले उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.