मनपाकडून आवाहन : शक्यतो...घरीचं करा गणेश मूर्तीचे विसर्जन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अनेकांचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पाचे शुक्रवारी घराघरांत आगमन होणार आहे. कोरोनाच्या संकटातही नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत असून गणेश मंडळ सुध्दा बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी भक्तांची गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन दर्शनाची सुविधा भक्तांसाठी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने काही मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक मंडळांमध्ये ४ तर घरांमध्ये २ फुटापर्यंतच्या बाप्पाची यंदा स्थापना करता येणार आहे. या वर्षी शक्यतो पारंपरिक गणेश मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे तर पर्यावरणपूरक मूर्तींचे घराच्या घरी विसर्जन करावे, असेही आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.
आरोग्यविषयक कार्यक्रमांना भर द्या...
दरवर्षी गणेश मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे आरोग्यविषयक कार्यक्रमांवर भर देण्यात यावे, असेही मनपाकडून सूचित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजारांबाबत व प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता आदींची मंडळांकडून जनजागृती केली जाईल.
मंडप निर्जंतुकीकरण फवारणी करावी
गणेश मंडळांनी दररोज मंडपामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करावी़ यासाठी मनपाकडूनही सहकार्य केले जाणार आहे. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांचे तापमान मोजून त्यांना दर्शनास जाऊ देण्याचे सूचीत मनपाकडून करण्यात आले आहे. आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याचीही दक्षता घ्यावे, असेही स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत.
ऑनलाइन दर्शन मिळणार
कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे गणेश मंडळांमध्ये दर्शनासाठी गर्दी होणार नाही़ याची काळजी मंडळांना घ्यावयाची आहे. यासाठी उपाययोजना म्हणून गणेश मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सुविधा गणेश भक्तांना उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच गणेश भक्तांमध्ये साेशल डिस्टन्सिंग पाळले जावे, याचीही दक्षता घेण्याचे मनपाने कळविले आहे.