धरणगाव : भगवे वस्त्र परिधान करुन दिवसभर लोकांना आशीर्वाद देणारे व गावभर साईबाबा म्हणून परिचित असलेले येथील रामभाऊ नामदेव महाजन या ८० वर्षीय निराधार वृध्दाचे उपचारादरम्यान १३ रोजी निधन झाल्याने शिवसैनिकांनी माणूसकीचा धर्म निभावत स्वत: खर्च करुन या वृद्धाचा अंत्यविधी केला.रामभाऊ महाजन हे येथील लहान माळीवाडा परिसरातील होते. त्यांची कपडे परिधान करण्याची शैली शिर्डीचे साईबाबा यांच्यासारखी होती, म्हणून त्यांना साईबाबा म्हणून टोपन नावाने ओळखले जात असे. गेल्या कित्येक वर्षांपासून कोट बाजार या ठिकाणी शिवसेना कार्यालयावर रात्रीच्या वेळी थोडी झोप घ्यायचे. त्यांना जेवण व चहापाणीचा खर्च शिवसेना गटनेते विनय भावे हे करीत असे.महाजन यांना मुले व पत्नी देखील आहे. मात्र ते कुठे आहेत याचा पत्ता नाही. आठ दिवसापूर्वी त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा शिवसैनिकांनीच त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.या उपचारादरम्यान१३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. गावात कोणीही नातेवाईक नसल्याने लागलीच शिवसेनेने अंत्यविधी निर्णय घेतला. फगवे कपडे आणून त्यांचा अंत्यविधीकेला.जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ , नगराध्यक्ष निलेश चौधरी , शिवसेना गटनेते पप्पु भावे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. अंत्ययात्रेला नगरसेवक भागवत चौधरी , विलास महाजन , किरण मराठे , जितू धनगर, राजेंद्र महाजन, संजय चौधरी, धिरेंद्र पुरभे, कडु महाजन आदी उपस्थित होते.
निराधार वृद्धाच्या अंत्यविधीत घडले माणूसकीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 15:26 IST