भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातून एकमेकांना मारहाण करण्यात आली. यात एका गटातील दोघे गंभीर तर दुसऱ्या गटातील तिघे जखमी झाले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले. घटनेनंतर काही वेळेत पोलिसांचा फौजफाटा गावात दाखल झाल्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत दूध विक्रेता मयूर सारंगधर पाटील (२५, रा. गांधी चौक साकेगाव) यांच्या फिर्यादीनुसार राहुल संतोष कोळी याने हातात लोखंडी पाईप घेत तसेच राहुल राजेंद्र सपकाळेने हातात कुऱ्हाड , निलेश बळीराम सोनवणेने काठी घेऊन तर विशाल सुभाष कोळी व सुभाष शामराव कोळी हे लोखंडी पाईप घेऊन मयूर पाटील याच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. तसेच कसले पैसे मागतो, असे म्हणत मयूर व त्याचा भाऊ महेश यास लोखंडी पाईप, कुऱ्हाड, कठीने मारहाण केली. राहुल कोळीने मयूरच्या डोक्यात पाईप मारून डोके फोडले. तसेच महेश याला राहुल सपकाळे याने कुऱ्हाडीने वार केला. सोबत एक दोन अनोळखी व्यक्तींनी लोखंडी पाईपने व काठीने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मयूर पाटील, महेश सारंगधर पाटील हे दोघे जखमी असून त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसरी तक्रार सुभाष शामराव कोळी (५५, धंदा शेती, रा. पंचमुखी हनुमान मंदिर साकेगाव) यांनी दिल्यानुसार ते दुकानावर सामान घेण्यास जात असताना त्यांना महेश सारंगधर पाटील यांनी हाक मारून व त्यांच्या सोबत उभा असलेला राजेंद्र दिवाकर भोळे हा काय म्हणतो असे म्हणाला. मात्र, म्हणून सुभाष कोळी हा महेश पाटील यांच्याकडे न जाता सामान घेण्यास दुकानावर गेला असता महेश सारंग पाटील हा दुकानावर जाऊन सुभाष कोळीला शिवीगाळ करून मारहाण करु लागला. त्यावेळी तेथे त्याचा भाऊ जयेश सारंगधर पाटील हा आला व त्याने ही महेश सारंग पाटील यांच्यासोबत मिळून सुभाष कोळीला मारहाण केली व शर्ट फाडला. ही बाब सुभाष कोळी यांनी घरात सांगितली असता त्यांचा पुतण्या ईश्वर उर्फ राहुल संतोष कोळी व भाचा निलेश बळीराम सोनवणे तसेच पुतण्या राहुल संतोष कोळी असे महेश पाटील यांच्या घरी मारहाणीचा जाब विचारण्यास गेले असता महेश पाटील व मयूर पाटील यांनी मिळून महेश सारंग पाटील याने त्याच्या हातातील पाईपने ईश्वर उर्फ राहुल कोळी याच्या डोक्यात तर जयेश सारंगधर पाटील याने त्याच्या हातातील कुर्हाडीने निलेश बळीराम सोनवणे यांच्या डोक्यात व मानेवर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. भांडण पाहून राहुल सपकाळे, निलेश सोनवणे, विशाल कोळी हे सोडवासोडवी करण्यास गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेत महेश सारंगधर पाटील, जयेश सारंगधर पाटील, मयूर सारंगधर पाटील या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यात ईश्वर उर्फ राहुल संतोष कोळी, निलेश बळीराम सोनवणे, राहुल संतोष कोळी हे जखमी झाले आहेत.
या घटनेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण या करीत आहे.