येथून जवळच असलेल्या देवळी येथे समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने सहा-सात वर्षांपूर्वी वीस ते बावीस लाख रुपये खर्च करून जुन्या मारोती मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या कळसाला आकर्षक अशी डिझाइन तयार करून रंगरंगोटी तसेच आकर्षक प्रवेशद्वार तयार करण्यात आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रथम गणपतीच्या मूर्तीचे दर्शन होते. त्यानंतर नवीन स्थापन केलेल्या हनुमंतरायाची आकर्षक अशा मूर्तीचे दर्शन होते. हाच संकटमोचक गावचा मेढ्या म्हणून सर्वांवर कृपादृष्टी ठेवत असतो. ज्यांना त्याची खरी भक्ती कळते, त्यांना त्याचा प्रत्यय आलेला असतो. ज्यांना त्याची भक्ती कळली नाही, फक्त आपल्या स्वतःच्या शक्तीतच धन्यता मानतात, अशा काही विकृत माणसांनी कधीकाळी मोकळा श्वास घेणारा संकटमोचक आज अतिक्रमणाच्या विळख्यात जखडून ठेवला आहे.
गावच्या काही मंडळींनी मारोती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच स्वत:च्या व्यवसायासाठी दुकाने थाटून जागा अधिग्रहित करून अतिक्रमण केले आहे. या मंदिराच्या बाजूला लहान बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण घेण्यासाठी अंगणवाडी केंद्र आहे. अंगणवाडी केंद्राच्या अवतीभवतीदेखील व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालून मंदिर परिसरातील अतिक्रमण थांबवावे. या व्यावसायिकांना इतरत्र जागा उपलब्ध करून द्यावी व मंदिराचे पावित्र्य जपावे, अशी मागणी गावातील भाविकांनी केली आहे.