लोकमत न्यूज नेटवर्क
शिरसोली : येथे अजूनही पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना आरोग्य केंद्रामध्ये दररोज चकरा माराव्या लागत आहेत. १५ दिवसांतून एक वेळा व तीदेखील अल्पप्रमाणात उपलब्ध होत असल्याने अशा कासवगतीने होणाऱ्या लसीकरणामुळे संपूर्ण गावकऱ्यांना लस कधी मिळेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे शिरसोली प्र.बो. व शिरसोली प्र.न. या दोन्ही गावात सुमारे ४० हजार लोकवस्ती आहे. मात्र प्रत्यक्षात या गावांमध्ये केवळ दीड हजार जणांना लस मिळाली आहे.
शिरसोली प्र.बो. व शिरसोली प्र.न. ही दोन स्वतंत्र गावे आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. मात्र या आरोग्य केंद्रात १५ दिवसातून एक वेळा कधीतरी लसीचे ५० ते १०० डोस उपलब्ध होतात. लस घेण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होते. लस उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना कामे सोडून सकाळपासून थांबून रहावे लागते. मात्र बहुतांश जणांना लस मिळत नसल्याने त्यांना लस न घेता परतावे लागते. त्यामुळे ‘कुणी लस देता का लस...’ अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. वरिष्ट आरोग्य अधिकाऱ्यांनी शिरसोली येथे लसीचा नियमित स्वतंत्र कोटा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.
केवळ २०० जणांना मिळाला दुसरा डोस
दोन्ही गावात आतापर्यंत केवळ एक हजार ५०० जणांना पहिला डोस, तर २०० जणांना दुसरा डोस मिळाला आहे. त्यामुळे लस किती मिळते व लसीकरण किती धिम्या गतीने सुरू आहे, याचा अंदाज येतो.