लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य शासनाने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यात १ मे पासून आतापर्यंत दोन हजार ८४१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर नागरिकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरू केले. त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील कोमॉर्बिड व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले.
जिल्ह्यात कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या नागरिकांसाठी जिल्ह्यात रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, जळगाव शहर महानगरपालिकेचे शाहू महाराज रुग्णालय व नानीबाई आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद अशी एकूण पाच केंद्रे सुरू केली आहेत. या पाच केंद्रांवर दैनंदिन १०० पुरुष व १०० महिलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
याशिवाय नियमित शासकीय केंद्रांवर ४५ हून अधिक वय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण सुरू राहणार आहे. यात दुसऱ्या डोससाठी पात्र नागरिकांना वेगळा कोटा देण्यात येत आहे.
असे झाले लसीकरण
एक मे ४११
दोन मे ६९५
तीन मे ७६९
चार मे ९६६
आतापर्यंत झालेले लसीकरण
२ हजार ८४१
झालेली नोंदणी
३६००
जिल्ह्यात तीन लाख लाभार्थ्यांचे लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४८ हजार ९९८ नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस, तर ५९ हजार १०८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्याला जास्तीत जास्त लसीचा साठा मिळावा यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.