उपजिल्हा रुग्णालयात गर्दी जास्त होत असल्याने त्या ठिकाणी पोलिसांनाही पाचारण करावे लागते. म्हणून लसींची उपलब्धता वाढावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. याही पुढे जाऊन लसीकरण केंद्रावर लस आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचीच डोकेदुखी वाढलेली असते आणि म्हणून जरी शासनातर्फे लस घेण्यासाठीचा संदेश नागरिकांना भ्रमणध्वनीवर गेलेला असतो, तरीही काही नागरिक रांगेत उभे राहून आधारकार्ड सोबत ठेवून लसीकरण करून घेण्यासाठी सकाळपासून रांगा लावत असतात.
या रांगेत क्रमांक मागेपुढे झाल्यावर आपसात हुज्जत होऊन हाणामारीपर्यंत प्रकरण गेले आहेत. ज्यांना संदेश गेलेला आहे, त्यांचा तर नंबरच लागत नसतो. म्हणून लसीकरण हे पोलिओ डोसप्रमाणे व्हावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दिनांक ७ रोजी चोपडा शहरासह सर्वच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मुख्यालय डोस उपलब्ध होते. मात्र अत्यल्प डोस उपलब्ध असल्याने आणि घेणाऱ्यांची संख्या दुप्पट, तिपटीने असल्याने हे राडे आणि हुज्जतबाजी होत असते. त्यासाठी लसीकरण सुटसुटीत होणे गरजेचे आहे.
यात हातेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराज हे मात्र सूत्रबद्ध लसीकरण कार्यक्रम राबवत असल्याने दिलेल्या वेळेवर लसीकरणासाठी नागरिकही उपलब्ध असतात आणि म्हणून तीच पद्धत तालुकाभर अवलंबण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.