लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाचा दर मंदावला आहे. आठ दिवसात १५ तालुक्यात मिळून ४६ हजार ४८६ जणांनाच लस मिळाली आहे. त्यातही दुसऱ्या डोसचे प्रमाण जास्त आहे. नव्याने लस घेण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच खासगी केंद्रांवर जाऊन लस घ्यावी लागत आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दर चांगलाच घसरला आहे. जिल्ह्यातील लसीकरणासाठी पात्र असलेली लोकसंख्या ही जवळपास ३५ लाख आहे. सध्या २२ जुलैपर्यंत सकाळी प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ९ लाख २१ हजार १८२ नागरिकांचे लसीकरण झाले आहे, तर मागील गुरुवारपर्यंत ८ लाख ७४ हजार नागरिकांचे लसीकरण झाले होते. त्यानंतर दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक लस मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
सरकारी केंद्रांवर लस कमी, तर खासगी केंद्रांवर लस उपलब्ध
जिल्हा प्रशासनाने मंगळवारी रात्री दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील सरकारी लसीकरण केंद्रांवर १३१० कोविशिल्ड आणि ७३० कोव्हॅक्सिन उपलब्ध होते. जळगाव शहरात महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर मिळून ३५० डोस होते, तर फक्त दोनच खासगी केंद्रांवर २२० कोविशिल्ड आणि ९५० कोव्हॅक्सिन उपलब्ध होते. त्यामुळे खासगी केंद्रांवर सरकारी केंद्रांच्या प्रमाणात लस जास्त उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर बुधवारी प्रशासनाने कोणत्या केंद्रावर किती लस उपलब्ध आहे. त्याची आकडेवारी दिलेली नाही.
कोट : सध्या शासनाकडे उपलब्ध असलेल्या लसीच्या डोसनुसार जिल्ह्याला लोकसंख्येच्या प्रमाणात लस मिळत आहे. त्यातही अनेकांचे दुसरे डोस बाकी आहेत. त्यामुळे दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात आहे. - अभिजित राऊत, जिल्हाधिकारी
एकूण लसीकरण
२२ जुलै - ९२११८२
२१ जुलै - ९२०५६९
२० जुलै- ९१८९६८
१९ जुलै - ९१०३१८
१८ जुलै - ९०४६८५
१७ जुलै - ८९८७११
१६ जुलै - ८७६६६४
१५ जुलै - ८७४६९६