जळगाव : जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्था व जिल्हा वकील संघ यांच्यातर्फे न्यायालयीन कर्मचारी, वकील व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ६ ते ८ मे या काळात कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ६५० कर्मचारी, वकिलांनी कुटुंबीयांसह लस घेतली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांच्याकडे कर्मचारी व वकील संघटनेने लसीकरणासाठी पाठपुरावा केला होता. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमलानी, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप बोरसे, विधि व सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच. ठोंबरे, न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्याम शिंदे, प्रबंधक पी.यू. महाले आदींच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या उपक्रमात सुमारे ६५० कर्मचारी, वकिलांनी कुटुंबीयांसह लस घेतली. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारा जळगाव जिल्हा राज्यात पहिलाच ठरला आहे. या उपक्रमासाठी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्था, जिल्हा वकील संघ, न्यायालयीन लघुलेखक संघटना, न्यायालयीन कर्मचारी संघटना, बेलिफ संघटना, चतुर्थ कर्मचारी संघटना यांच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी सहकार्य केले.