मुक्ताईनगर : येथील उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटांच्या श्रेणी वर्धन प्रस्तावाला मान्यता मिळावी, या प्रमुख मागणीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी ७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे लेखी पत्राद्वारे प्रस्ताव देऊन मंजुरीसाठी विनंती केली. या पत्रावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी लागलीच स्वाक्षरी करून प्रस्ताव संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविला आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय हे तालुक्याचे ठिकाणी असून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ तसेच इंदोर - औरंगाबाद या दोन महामार्गांवर आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात बाहेरगावाहून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या तसेच महामार्गावर दररोजचे होणारे अपघात त्यामुळे येथे रुग्ण संख्या अधिक असते. मात्र, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या कमतरतेमुळे पुरेशी सेवा सुविधा करून देणे शक्य होत नाही. त्यामुळे पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवावे लागते. उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथील १०० खाटांचा श्रेणी वर्धन प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करण्यात आलेला आहे.