गैरसोय : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्बंध कायम
जळगाव : कोरोना काळात सुरु झालेली जळगावची विमान सेवा आठवड्यातून दर रविवारीच मुंबईकडे जात असून, १ डिसेंबर नंतर ही सेवा दररोज पूर्ववत सुरु होणार होती.मात्र, राज्य शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबर पर्यंत वाढवून, विमानसेवेवरील मर्यादित निर्बंध कायम ठेवल्यामुळे ३१ डिसेंबर पर्यंत मुंबईची सेवा आठवड्यातून एकच दिवस राहणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.
कोरोनामुळे सुरुवातीला तीन महिने आणि नंतर पुन्हा काही दिवस स्थगित झालेली विमान सेवा ६ सप्टेंबर पासून पुन्हा नियमित सुरु झाली आहे. मात्र, कोरोनामुळे शासनाच्या निर्देशानुसार ही सेवा आठवड्यातून तीनच दिवस धावत आहे. यामध्ये दर बुधवारी व शनिवारी अहमदाबाद ते जळगावची सेवा असून, दर रविवारी मुंबईची सेवा आहे. राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक विमान कंपन्याच्या उड्डाणांना बंदी घातली असून, आठवड्यातून मर्यादित दिवशीच उड्डाणांना परवानगी दिली आहे. या मध्ये जळगावला विमानसेवा देणाऱ्या विमान कंपनीचाही समावेश आहे. त्यामुळे या कंपनीतर्फे आठवड्यातून एक दिवस दर रविवारी मुंबईची सेवा देण्यात येत असून, या विमान कंपनीची नांदेड विमान तळावरही सेवा असल्याने नांदेड येथूनही एक दिवस सेवा देण्यात येत असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय :
सध्या रेल्वे गाड्या सुरु झाल्या असल्या तरी, या गाड्यांना आरक्षण मिळत नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी प्रवाशी वाहनांनी जादा पैसे मोजून मुंबईकडे जावे लागत आहे.तसेच या प्रवासात ८ ते १० तास लागत असल्याने प्रवाशांना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात अशा परिस्थितीत आठवड्यातून एकच दिवस विमानसेवा सुरु असल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
इन्फो :
आरटीपीसीआर चाचणीचा प्रशासनाकडे अहवाल नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिल्ली, गोवा, राजस्थान व गुजरात राज्यातून विमानाने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक केले आहे, तर ज्या प्रवाशांकडे अहवाल नसेल,त्यांची विमानतळावरच आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार जळगाव विमानतळावर जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन, ही प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.दरम्यान, आठवडाभरात किती प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या? किती प्रवाशी कोरोना बाधित आढळले?, याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांच्याकडे माहिती मागितली असता,त्यांनी आपल्याकडे जिल्ह्याची माहिती असून, विमानतळाची माहिती नसल्याचे सांगितले. तर विमानतळावरील संचालक सुनील मगरीवार यांनीही त्यांच्याकडे या संबंधाची कुठलिही माहिती नसल्याचे सांगितले.