नंदुरबार :अक्कलकुवा (सोरापाडा) येथे बेवारसरीत्या सापडलेल्या बालकाचा पोलीस ठाणे, रुग्णालय, शिशूगृह असा प्रवास होऊन अखेर त्याच्या आईवडिलांच्या कुशीत तो विसावला. बालकाला पालक मिळाल्याने व पालकांना बालक मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावरील हसू सर्वांनाच समाधान देऊन गेले.
सोरापाडा, ता.अक्कलकुवा येथे २२ नोव्हेंबर रोजी चार वर्षांचा बालक अर्जुन पाडवी यांना सापडला होता. बालकाला नाव, गाव काहीच सांगता येत नव्हते. त्यामुळे त्याला अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनीही तपास केला. मात्र, त्याचे पालक मिळू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी बालकल्याण समितीशी संपर्क साधला. समितीने धुळे येथील शिशुगृहास कळवून त्यांच्याकडे पुढील संगोपनासाठी बालकाला सुपूर्द केले. बालकाचा फोटो व माहिती वृत्तपत्रातून आल्यावर त्याच्या धानोरा येथील पालकांना कळाली. त्यांनी धानोरा येथे राहणारे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती विक्रम पाडवी यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष प्रा.ईश्वर धामणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बालक ताब्यात मिळावे यासाठी धुळ्याशी संपर्क साधला. सर्व प्रक्रिया पार पाडून रविवारी बालकाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या वेळी पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या वेळी चंद्रकांत बेहरे, अविनाश माळी, संजय पुराणिक, शोभा आफ्रे, विजय साळुंखे, परमेश्वर देवरे, संदीप सावंत, मीनाक्षी कोळी, सुनीता फुलपगारे आदी उपस्थित होते.