वाघडू, ता. चाळीसगाव : ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. यात वाघडू वाकडी रोकडे परिसरास आठ ते दहा गावांत नुकसान झाल्याने बळीराजावर अस्मानी संकट कोसळले आहे. तरी शासनाने विलंब न करता शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
वाघडू-वाकडी रोकडे गावावर तर आभाळच कोसळले. यासह खेरडे, बानगाव, रोकडे, वाकडी येथे ढगफुटीसदृश स्थिती निर्माण झाली. वाकडी येथे नदीजवळील भास्कर गोविंदा पाटील, शोभा किरण पाटील या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पशुधन पुरात वाहून गेले. त्याचबरोबर संभाजी पाटील या शेतकऱ्याच्या वीस बकऱ्या इतर पंधरा ते वीस शेतकऱ्यांचे लाखोंचे पशुधन डोळ्यादेखत वाहून गेले.
आज पशुधनावर उपजीविका असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले व ते रस्त्यावर आले आहेत. वाघडू, रोकडे, वाकडी गावातील शेकडो हेक्टर पीक पाण्यात गेले. संसार डोळ्यासमोर पाण्यात वाहून गेला तरी शासनाने मदत करावी, असे आवाहन परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केले आहे.