जळगाव : मध्यप्रदेशात पर्यटनाला गेलेले दोन तरुण खरगोन जिल्ह्याच्या हद्दीत धरणात बुडाल्याची भीती व्यक्त होत असून त्यातील एक तरुण खेडी तर तरुण वाघ नगरातील असल्याची माहिती मिळाली.
श्रावण महिन्याचा शेवटचा शनिवार असल्याने खेडी, वाघ नगर व शहरातील १६ तरुण मध्यप्रदेशातील शिरवेल येथील महादेवाच्या दर्शनाला गेले होते. तेथील एका धरणात पोहत असतांना खेडी व वाघ नगर येथील दोन तरूण त्यात बुडाले आहेत. खेडीच्या तरुणाचे नाव उज्ज्वल (वय २४) असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघ नगरातील तरुणाचे नाव मात्र स्पष्ट झालेले नाही. उज्ज्वलचा शनिवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी ही घटना घडली आहे,याबाबत ठोस माहिती मिळाली नसती तरी खेडी येथील तरुण बुडाल्याच्या वृत्तास एमआयडीसी पोलिसांनी दुजोरा दिलेला आहे. हा तरुण एका वित्तीय संस्थेत वसुलीचे काम करतो तर त्याचे वडील ऑटोमोबाईल क्षेत्रात कामाला आहेत. या घटनेनंतर काही तरुण परतीच्या मार्गाला निघाले आहेत रात्री अकरा वाजेपर्यंत ठोस माहिती मिळू शकलेली नव्हती.