जळगाव : विवेकानंद नगर व भोईटे नगर भागात मंगळवारी मध्यरात्री दोन ठिकाणी चोरी व घरफोडी करीत चोरट्यांनी ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी जिल्हापेठ व शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. उकाड्यामुळे कुलर लावलेल्या खिडकीतून चोरटा शिरला तर दुसर्या घटनेत गच्चीवर झोपल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळाले. पिंप्राळा रस्त्यावरील भोईटे नगरातील रहिवासी मोहनसिंग समरपालसिंग (वय-२३) हे आर.एफ.इंजिनियरींग वोडाफोन अॅण्ड एअरटेल कंपनी येथे खाजगी नोकरीला आहेत. मंगळवारी मध्यरात्री ते घरात झोपलेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्याने कुलरच्या उघड्या खिडकीतून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्याने फिर्यादी यांच्या खिशातील सात हजार रुपये रोख, एक आठ हजाराचा, दुसरा ११ हजारांचा तर दोन एक-एक हजाराचे असे २१ हजार रुपयांचे मोबाईल गायब केले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस स्टेशनला धाव घेतली. या प्रकरणी मोहनसिंग समरपालसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तपास उपनिरीक्षक व्ही.डी.चव्हाण करीत आहेत. दुसर्या घटनेत चोरट्यांनी विवेकानंद नगरातून ३८ हजारांचा ऐवज चोरून नेला. चोरट्याने कपाटातील केवळ सोने व चांदीचे दागिने ठेवलेल्या वस्तू गायब केल्या आहेत. अन्य कोठेही चोरट्याने दागिने किंवा रोकडचा शोध घेतलेला नाही. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संध्याकाळी या तरुणाची पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. विवेकानंद नगर भागातील हेमलता महेश वर्मा यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री एक ते सकाळी आठ या दरम्यान प्रवेश करीत घरातील ३८ हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यात ३४ हजार रुपयांचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने होते. त्यात अडीच ग्रॅमची सोन्याची चेन, दीड ग्रॅमचे पेंडल, चार ग्रॅमची अंगठी, तीन ग्रॅमची महिलेची अंगठी, दोन ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स्, पाच मणी असलेली पोत याचा समावेश आहे. यासह १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे पायल, १५ ग्रॅमचा चांदीचा दिवा असे साडे चार हजाराच्या वस्तू व रोख ५०० रुपये गायब केले. वर्मा कुटुंबीय हे उकाडा होत असल्याने गच्चीवर झोपलेले होते. चोरट्यांनी ही संधी साधत घरात प्रवेश करीत ३८ हजारांचा ऐवज गायब केला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
दोन घरफोड्यांमध्ये ६७ हजारांचा ऐवज लांबविला
By admin | Updated: May 14, 2014 01:00 IST