लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव: शनिपेठेतील काट्याफाईल भागात मध्यरात्री दोन वाजता दोन गटात दंगल उसळली. गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली. त्यात दोन्ही गटात हाणामारी होऊन त्याचे रूपांतर दंगलीत झाले.
एकमेकांमध्ये दगडफेक तसेच दारूच्या बाटल्या फेकण्यात आल्या. यार शनी पेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश माळी व मुकूंद गंगावणे हे दोन जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह शहरातील अधिकाऱ्यांचा ताफा दाखल झाला असून नियंत्रण कक्षेतून अतिरिक्त कुमक मागविण्यात आलेली आहे. रात्री दहा वाजता दोन गटात वाद झाला होता. तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला होता. त्यानंतर पुन्हा दोन वाजता पुन्हा वाद उफाळून आला. दोन गट समोरासमोर आले. दगडफेक व बियरच्या बाटल्यांचा मारा करण्यात आला. संशयितांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे.