कजगाव, ता. भडगाव : येथे डेंग्यूचे थैमान थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी सहा रुग्ण आढळून आल्यानंतर आता पुन्हा दोन रुग्ण आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कजगाव येथील नागद रोडवरील जिल्हा परिषद शाळेसमोरील जीन परिसर हा डेंग्यूचा हॉटस्पॉट ठरत आहे. जीन परिसरात आज पुन्हा दोन रुग्ण आढळून आल्याने या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या भागातील रहिवासी संजय जयराम महाजन यांचा १५ वर्षीय मुलगा प्रथमेश संजय महाजन व संजय चिंधा महाजन यांची १३ वर्षीय मुलगी पूनम संजय महाजन या दोघांना डेंग्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच-सहा दिवसांत डेंग्यूने चांगलेच डोके वर काढले आहे. डेंग्यू रुग्ण हा गावात चर्चेचा विषय झाला आहे.
जीन परिसर ठरतोय डेंग्यू हॉटस्पॉट
कजगाव येथे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यातच कजगावात एकूण आठपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. दोन रुग्ण इतर भागातील तर उर्वरित सर्वच रुग्ण हे जीन परिसरातील आहेत. त्यामुळे डेंग्यूचा हॉटस्पॉट ठरणाऱ्या जीन परिसराकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून सर्वेक्षण सुरू केले असून, प्रत्येक ठिकाणी उघड्या पाण्याच्या टाक्या व परिसराची तपासणी करून पाण्यात साचलेल्या डबक्यात औषधी टाकली जात आहे. कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे तर ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्यात येत आहे.
साचलेले पाणी, डबके येथे डास भक्षक गप्पी मासे सोडण्यात यावेत. ज्या भागामध्ये वाढ झालेली आहे, तेथे कीटकनाशक फवारणी घरोघरी करण्यात यावी. तसेच धूरफवारणीचे कार्य मागणीनुसार करण्यात यावे. प्रशासनाने डेंग्यूसारख्या आजारावर त्वरित नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
- विनोद हिरे, स्थानिक ग्रामस्थ, जीन परिसर
220721\22jal_1_22072021_12.jpg
डेंग्यूचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या भागात पाहणी करताना डॉ. प्रशांत पाटील सह आरोग्यसेवक.