कजगाव, ता. भडगाव : कजगाव येथील चोरीचे सत्र थांबण्यास तयार नाही. चोवीस तासांत दोन मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याने वाहनधारकांत घबराट पसरली आहे.
राजकुवर मंगल कार्यालयाजवळील रहिवासी गौरव सरदारसिंग पाटील यांच्या घराजवळ लावलेली दुचाकी (एमएच १५ बीआर १७४६) अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री लांबवली. या घटनेस काही तास उलटत नाही तोच कजगाव पारोळा मार्गावरील रेल्वे गेटजवळून माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल रघुनाथ महाजन यांची दुचाकी (एमएच १९ डीएफ ७०७६) दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी लांबवली.
चोवीस तासांत दोन मोटारसायकली लांबवत अज्ञात चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. याअगोदर दि. ११ एप्रिल रोजी एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या करीत मोठा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता. त्यानंतर काही तासांतच रस्ता लूट झाली. याचा तपास लागत नाही तोच एकाच दिवसात दोन दुचाकी लांबवत चोरट्यांनी आपले हातपाय पसरविणे सुरू केले आहे. या अज्ञात चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.