लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून रिक्षाचालकांना रिक्षांमध्ये प्लॅस्टिक (पारदर्शक) पडदा बसवावा लागणार आहे. रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यामध्ये हा पडदा असणार आहे. या पडद्यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यामधील संभाव्य संसर्ग टाळण्यास मदत होणार आहे. दरम्यान, सूचनांचे पालन न केल्यास संबंधित रिक्षाचालकावर कारवाई केली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून रिक्षा व्यवसाय बंद होता. पण, अत्यावश्यक सेवेकरिता ऑटोरिक्षामधून कमाल दोन प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर रिक्षाचालक आणि प्रवासी यांची सुरक्षा राखली जावी, यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी आवश्यक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सर्व ऑटोरिक्षाचालकांनी ऑटोरिक्षांमधील प्रवासी व चालक यांच्यात संपर्क होऊ नये, याकरिता त्यांचे ऑटोरिक्षांमध्ये चालक केबीन व प्रवाशांना बसण्याची जागा यादरम्यान फायबर किंवा प्लॅस्टिकचे अथवा इतर पारदर्शक पडद्याने विभाजन करावे जेणेकरून होणारा संसर्ग टाळता येईल, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
अन्यथा कारवाई
ऑटोरिक्षामध्ये प्लॅस्टिक पडदा लावूनच प्रवासी वाहतूक करावी. जे ऑटोरिक्षाधारक या सूचनांचे पालन करणार नाहीत, अशा ऑटोरिक्षाचालकांविरुद्ध १६ मेपासून मोटार वाहन कायदा १९८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ व भारतीय दंड संहिता अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, याची सर्व ऑटोरिक्षाचालकांनी नोंद घ्यावी. असे श्याम लोही यांनी कळविले आहे.