राष्ट्रीय महामार्ग प्रशासनातर्फे भुसावळ ते जळगाव दरम्यान महामार्ग विस्तारिकरणाचे काम सुरू असून, भादलीच्या पुढे रेल्वे ट्रकच्या वर वाहतुकीसाठी उड्डाणपुल उभारण्यात येत आहे. या उड्डाणपुलासाठी महामार्ग प्रशासनातर्फे रेल्वेच्या मदतीने या ठिकाणी गर्डर टाकण्यात आले. या कामासाठी भुसावळ ते भादली सकाळी १०.३० ते दुपारी १ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला होता. यावेळी जळगाव ते भुसावळ हा महामार्ग लांबीला ३६ मीटरचा असल्याने, तितक्या ३६ मीटरचे या ठिकाणी एकूण तीन गर्डर टाकण्यात येणार आले. प्रत्येकी ९० टन क्षमतेचा एक गर्डर असून, हे गर्डर टाकण्याच्यासाठी बाहेरून अत्यानुधिक क्रेन मशीन मागविण्यात आल्या होत्या. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नही)चे संचालक चंद्रकांत सिन्हा, मुकादम अनिलकुमार यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
इन्फो :
ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांना विविध स्टेशनवर थांबा
या कामामुळे मुंबई व सुरतकडून येणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या. यामध्ये अहमदाबाद-हावडा जळगाव रेल्वे स्टेशनवर, अहमदाबाद-बरौनी एक्सप्रेस पाळधीला, मुंबई-हावडा एक्सप्रेस शिरसोली स्टेशनवर, गोवा एक्सप्रेस म्हसावदला तर गोरखपूर काशी एक्सप्रेसला चाळीसगावला थांबविण्यात आले होते. यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
इन्फो :
या गाड्या धावल्या विलंबाने
१) अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस २ तास लेट
२) अहमदाबाद-बरौनी एक्सप्रेस ३ तास लेट
३) मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस २ तास लेट
४) गोवा एक्सप्रेस २ तास लेट
५) काशी एक्सप्रेस १ तास लेट
इन्फो :
दुपारी पुन्हा घेतला एक तासांचा मेगाब्लॉक
सकाळी १०.३० ते दुपारी १ पर्यंत मेगाब्लॉक घेतल्यानंतर या वेळेत तिन्ही गर्डर टाकण्यात आले. मात्र, काही ठिकाणी तांत्रिक कामे व गर्डरचे लेव्हलिंग करण्याचे काम अपूर्ण राहिले होते. त्यामुळे या कामासाठी दुपारी ४ वाजता पुन्हा एका तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. यावेळी सर्व तांत्रिक काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान, या कामामुळे दुपारच्या सत्रातील काही गाड्या विलंबाने धावल्याने प्रवाशांना पुन्हा गैरसोयीचा सामना करावा लागला.