यावल : शंभर वर्षांहून अधिक परंपरा असलेला येथील मुस्लीम बांधवांचा पेहरन-ए-शरीफ उत्सव मंगळवारी २४ रोजी होऊ घातला होता, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही उत्सवाची मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. येथील पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासन व उत्सव समितीच्या बैठकीत उत्सव रद्द करण्याचा निर्णय आयोजन समिती डांगपुरा यांनी जाहीर केला आहे.
येथील नजमोद्दीन अमिरोद्दीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन आणले होते. त्यास तब्बरूक (पवित्र वस्त्र) असे म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे या पवित्र वस्त्राची सजविलेल्या डोलीतून शहरातून वाद्यवृंदाच्या गजरात धार्मिक गीत गात मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी उर्दु वर्षानुसार मोहरम महिन्याच्या १४ तारखेस हा उत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवाहत सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन अर्थात तब्बरूक (पवित्र वस्त्र) चे दर्शन घेण्याकरिता राज्यासह परराज्यातील सर्वधार्मिक बांधव येथे येतात. त्यामुळे शहरास यात्रेचे स्वरूप येते. या उत्सवात सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने उत्सवात एकात्मतेचे दर्शन घडते. मिरवणुकी दरम्यान पेहरन-ए-शरीफच्या डोलीखालून निघताना भाविक मन्नत (मागणे) मागतात. भाविकाने मागितलेले मागणे हमखास पूर्ण होते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. मात्र, गेल्या वर्षांपासून कोरोनाचे संकट आल्याने गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हा उत्सव रद्द करण्यात आला. यंदादेखील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी यंदाची उत्सव समिती डांगपुराचे सदस्यासोबत बैठक घेतली व यात हा उत्सव यंदादेखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, पारंपरिक पध्दतीने सायंकाळी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीच पार पाडला जाणार आहे. या ठिकाणी कुणीही दर्शन घेण्याकरिता येऊ नये असे आवाहन उत्सव समिती डांगपुरा अध्यक्ष शेख असलम शेख मुन्सी, उपाध्यक्ष शेख मुशीर शेख बशीर, खजिनदार शेख रशीद शेख बशीर, सचिव शकील खान कुरेशी, शेख अलताफ, शेख रशीद मन्यार, शेख रईस, शेख इमरान आदींनी केले आहे.