लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील मुख्य मार्केटवगळता मुख्य रस्त्यालगत मनपाने कोठेही स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांची स्वच्छतागृहांअभावी मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. मनपा प्रशासन, महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी व माजी स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांच्या पाठपुराव्यानंतर लोकसहभागातून शहरात स्वच्छतागृह तयार करण्यात येणार असून, लवकरच शहरातील नवीन बसस्थानकासमोर स्वच्छतागृह तयार केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
त्यासाठी वाहतूक शाखेची नाहरकत घेण्यात येणार असून, यासाठी मनपाने वाहतूक शाखेला पत्रदेखील पाठविले आहे. तसेच या जागेवरील अतिक्रमण दोन दिवसांत काढण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. याबाबत शुक्रवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी अतिक्रमणधारकांना दुकाने काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत शहरातील मुख्य रस्ते व गर्दीच्या ठिकाणांवर सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. यात महिला वर्गाची सर्वाधिक अडचण होत असते. गेल्या काही महिन्यांपासून महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यासंदर्भात महासभा व स्थायी समिती सभेत चर्चा करण्यात येत होती. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत सुप्रीम कंपनीच्या माध्यमातून नवीन स्वच्छतागृह उभारण्यात मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मनपाच्या जागेतील सुविधायुक्त स्वच्छतागृहाप्रमाणेच त्याच स्वरूपाचे महिला व पुरुषांसाठी उपयुक्त असे स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. सुप्रिम कंपनीने याआधी जुन्या नगरपालिकेच्या जागेवर स्वच्छतागृह तयार केले असून, याठिकाणी नागरिकांची गैरसोय टळली आहे. दरम्यान, नवीन बसस्थानकासमोरील कामाला सुरुवात व्हावी या हेतूने रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी असे पत्र मनपाच्या बांधकाम विभागाने अतिक्रमण विभागाला दिले आहे. त्या अनुषंगाने उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दुपारी वाहतूक शाखेच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या अतिक्रमणाची पाहणी करण्यात आली. तसेच दोन दिवसांत संबंधितांनी अतिक्रमण काढून घ्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेने वाहतूक शाखेला पत्र पाठवून स्वच्छतागृह उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळावे अशी विनंती केली आहे. वाहतूक शाखेचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर येत्या काही दिवसांत भूमिपूजन होऊन स्वच्छतागृहाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. यामुळे जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टळणार आहे.