मध्ययुगीन कालखंडात किल्ल्याच्या आश्रयाने शत्रूशी लढा देतांना किल्ल्याचे रक्षण करणे अशक्य असल्याचे लक्षात येताच राजपूत सेनानी
केसरीया बाणा धारण करून मारू किंवा मरू या ध्येयाने प्रेरित होऊन ते शत्रुवर तुटून पडत. काही झाले तरी मागे फिरायचे नाही, शत्रूला पाठ दाखवायची नाही. लढता लढता वीरमरण आले तरी हा विचार करून लढणाऱ्या सैनिकांच्या या बाण्याला राजपुतान्यात केसरीया बाणा असे संबोधले जात असे.
किल्ल्यांवरील स्त्रीयांनी शील रक्षणार्थ जौहर केल्यावरच बहुधा केशरीया बाणा या युद्ध पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने केसरीया
बाणाच्या लढाईत त्वेष व प्रतिकाराचा वेग अधिक असे. केसरीया बाणा या अंतर्गत राजपूत सेनानी केशरी रंगाचे वस्त्र परिधान करून दोन्ही हातात तलवार घेऊन व किल्ल्याचे दरवाजे सताड उघडे करीत जिवाची पर्वा न करता शत्रू सैन्यावर तुटून पडत आणि प्राणपणाने लढता-लढता वीरगती प्राप्त करीत.
मात्र राणा प्रतापांनी त्यांच्या काळात स्वत:चे अस्तित्व संपवून टाकणाऱ्या या कृतीचे कधीच समर्थन केलेले नव्हते. त्यांनी मोगलांशी जवळपास २१ वर्ष झुंज दिली. मात्र या संघर्षात त्यांनी स्वत:ला कधीच संपवून घेतले नाही. राणा प्रतापांनी या प्रणालीला विचारपूर्वक दूर सारले होते. राणा प्रतापांनी शहीद होण्याच्या लालसेने यज्ञकुंडात उडी घेऊन मारू किंवा मरू या कृतीवर भर देण्याऐवजी स्वत:ला वाचविता वाचविता मेवाडलाही वाचविले होते, ही लहान गोष्ट नव्हती.
भाऊबंदकीसोबत युद्ध टाळण्याचा प्रघात मध्ययुगीन कालखंडात राजपुतान्यात शुल्लक कारणांमुळे युद्ध वा लढाई होणे ही नित्यातीच बाब समजली जात असे. महाराणा उदयसिंह यांच्या काळात राणा प्रताप व शक्तीसिंह या त्यांच्या दोन पुत्रांमध्ये शुल्लक कारणावरून वितृष्ट निर्माण झाले व त्याचाच परिपाक म्हणजे शक्त्तीसिंह मोगलांच्या सेवेत जाऊन मिळाले होते. तर महाराणा उदयसिंह यांनी राणा प्रतापांचा अधिकार डावलत जगमाल यांस मेवाडचा उत्तराधिकारी बनविण्याचा निर्णय घेतला होता.
वस्तुत: मेवाडच्या सरदारांमुळे महाराणा उदयसिंहाचा तो निर्णय पूर्णत्वास जाऊ शकला नव्हता. सर्व सरदारांनी मेवाडच्या गादीवर राणा
प्रतापांनाच स्थानापन्न केले होते. परिणामी नाराज झालेला जगमाल हाही मोगलांना जाऊन मिळाला. तेव्हा बादशाह अकबराने त्यास मेवाडच्या प्रदेशालगत असलेल्या जहाजपूरची जहागिरी बहाल करून राणा प्रतापांच्या विरोधात त्यांच्याच
सावत्र भावास प्रतिपक्षाच्या रुपात उभे केले होते.
राणा प्रतापांनी सावत्र बंधू जगमालवर किंवा त्याच्या जहांगिरीवर एकदाही आक्रमण केले नव्हते. किंबहुना त्याच्या जहांगिरीला त्रास
पोहोचविण्याचा कोणताही प्रयत्न केला नव्हता. यावरून राणा प्रतापांनी भाऊबंदकीसोबत युद्ध टाळण्याचा एकप्रकारे प्रघात घालून दिला असल्याचे
दिसून येते. इतकेच नव्हेतर राणा प्रतापांनी बंधू शक्तीसिंहालाही भिंडर येथील जहागिरी प्रदान करून त्यांच्याशी पुन्हा सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले होते.
राणा प्रताप चित्तोडगड हातातून गेल्याचे दु:ख कदापि विसरलेले नव्हते. त्यामुळेच जोपर्यंत चित्तोडसह पूर्ण मेवाड जिंकून घेत नाही, तोपर्यंत अत्यंत साधी राहाणी अवलंबिण्याची त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती. ही प्रतिज्ञा पूर्ण होईपर्यत त्यांनी युध्दप्रसंगी वाजविला जाणारा नगारा सेनेच्या सेनेच्या अग्रभागीऐवजी सैन्यांच्या शेवटी वाजविण्याचे निर्देश दिलेले होते. जेणेकरून ही प्रतिज्ञा पूर्ण करण्याचे त्यांना नित्य स्मरण होत राहावे, ही संकल्पना त्यांची या कृती मागे असल्याचा प्रत्यय येतो.
राणा प्रताप मेवाडच्या सिंहासनावर फक्त २५ वर्षे विराजमान होते. पण या अल्पावधीतही त्यांनी देश व काल यांच्या सीमा पार करणारी कीर्ती संपादन केली होती. त्यामुळेच ते आणि त्यांचे राज्य म्हणजे वीरता, बलिदान व देशाभिमान यांचे जणू प्रतीकच बनले होते.
ज्याप्रमाणे राणा प्रताप अखेरपर्यंत चित्तोड परत घेण्यासाठी अस्वस्थ होते, त्याचप्रमाणे बादशहा अकबरसुध्दा संपूर्ण आयुष्य मेवाडवर वर्चस्व
मिळविण्यासाठी अस्वस्थ होता. मात्र परिस्थितीमुळे राणा प्रतापांना चित्तोड न जिंकताच जड अंत:करणाने व अपुऱ्या स्वप्नानिशी जगाचा निरोप घ्यावा लागला. हीच परिस्थिती अकबराच्या वाटेला आली होती. बादशहा अकबर जरी हिंदुस्थानचा सम्राट असला तरी त्यास शेवटपर्यंत मेवाडवर अधिपत्य मिळविता आले नव्हते. त्यामुळे हे शल्य उरात बाळगूनच बादशहा अकबराचा मृत्यू झालेला
होता. म्हणजेच बादशाह अकबराचे मेवाड जिंकण्याचे स्वप्न सुध्दा अपूर्णच राहिले, हा एक असाधारण असा योगायोगच म्हणावा लागतो.
डॉ. नरसिंह परदेशी - बघेल