जळगाव : दोन दिवसापूर्वी पोलीस चौकीला लागूनच किराणा दुकानदाराकडे दोन लाखाची घरफोडी तर शनी मंदिरात दर्शनाला आलेल्या व्यापाऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून १ लाख ६० हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा सोमवारी द्रौपदी नगरात भरदिवसा ४ लाखाची तर अयोध्या नगरात साठ हजाराची घरफोडी झाली. सालार नगरात वकिलाच्या दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाखाची रोकड लांबविण्यात आली. सततच्या या घटनांमुळे चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे सिध्द होत आहे.
घटना पहिली
कल्पेश संतोष पाटील (वय,२४) हा तरुण आई व वडील संतोष नारायण पाटील व पत्नी यांच्यासह अयोध्या नगरात वास्तव्याला आहे. कल्पेश पाटील आणि संतोष पाटील हे पिता पूत्र खासगी नोकरी करतात. १ फेब्रुवारी रोजी सकाळी दोघे कामाला निघून गेले. कल्पेश यांच्या आई व पत्नी कामानिमित्त गावात गेल्या होत्या. सायंकाळी सहा वाजता सासू व सून घरी आल्या असता घराच्या दरवाजाचे कुलुप तोडलेले होते तर घरात साहित्याची नासधूस झालेली होती. कपाटात ठेवलेले ३७ हजार ५०० रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत, १५ हजार रूपये किंमतीचे मनी मंगळसुत्र, ५ हजार रूपये किंमतीचे चांदीचे भार असा एकुण ५७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल गायब झालेला होता. कल्पेश पाटील यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहे.