नशिराबाद/जळगाव : तूप विक्री करून दमलेल्या दोन महिलांनी एका दांपत्याकडे दोन घास जेवायला मागितले. अतिथी देव भव..प्रमाणे दाम्पत्याने त्यांना तृप्त होईपर्यंत प्रेमाने जेऊ घातले. नंतर त्यांनीच दांपत्याला संमोहित केले आणि घरातील ३० हजार रुपये रोख व इतर सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ९९ हजार ८२१ रुपयांचा ऐवज घेऊन या महिला पसार झाल्या. यात विशेष म्हणजे, हे दांपत्य या महिलांना सोडण्यासाठी महामार्गापर्यंत आले. नशिराबाद येथे हा प्रकार उघडकीस आला असून शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम बारसू तेली (वय ५६) हे पत्नी शकुंतला व कुटुंबीयांसह नशिराबाद येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळच वास्तव्य करतात. त्यांच्याकडे २८ जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन महिला शुद्ध तूप घ्या असं सांगत विचारपूस करत होत्या. दोनशे रुपये किलोच्या भावाने तूप खरेदी करा असा आग्रह करीत त्यांनी प्यायला पाणी मागितले. त्यानंतर घरात शिरकाव करून दोन घास जेवायला मिळेल का? अशी विचारणा केली. दांपत्यानेही घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरतिथ्य केलेच पाहिजे या हेतूने त्यांना जेवण दिले. दोन्ही अनोळखी महिलांनी शकुंतला तेली यांना डोळ्यांच्या साह्याने संमोहित केले. शकुंतला तेली यांनी त्यांना घरातून प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची साडेतीन तोळा वजनाची अंगठी तर दोन सोन्याच्या वेली जोडी मिळून दहा ग्रॅम दागिने व ३० हजार रुपये रोख असा तब्बल एक लाख ९९ हजार ८२१ रुपयांचे दागिने व रक्कम त्या दोघा महिलांना काढून दिली, इतकेच नव्हे तर दोघी महिलांना महामार्गावर तरसोद फाट्यापर्यंत सोडायला सुद्धा दाम्पत्य गेले.
घरी आल्यावर उघड झाला प्रकार
या महिलांना सोडून घरी आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे दांपत्याच्या लक्षात आले. तोपर्यंत त्या महिला दागिने व रक्कम घेऊन पसार झाल्या होत्या. या दोन अनोळखी महिलांचा काठेवाडीसारखा पेहराव होता. त्यापैकी एकाचे वय अंदाजे सुमारे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा घागरा लाल रंगाचा, गुलाबी रंगाची चोळी व स्कार्फ तर दुसऱ्या महिलेचे वय ४५ ते ५० वयोगटातील आहे. तिचा हिरव्या रंगाचा काठेवाडीसारखा पेहराव होता. दोघी सडपातळ होत्या, उंची साधारण साडेपाच फूट असल्याचे वर्णन फिर्यादीत देण्यात आलेले आहे. यासंदर्भात पुरुषोत्तम बारसू तेली यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण पोलीस तपास करीत आहेत.