लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेत गेल्या महिनाभरापासून पंचायत राज समितीच्या दौऱ्यासाठी धावपळ सुरू आहे. त्यातच समिती सर्वांत आधी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याने यावेळी पदाधिकारी नेमके काय मुद्दे मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यात अधिकाऱ्यांकडून वेळेवर काम न हाेणे, वर्षानुवर्षे रखडलेली वसुली आणि कुपोषणाचा मुद्दा यावेळी उपस्थित केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
पंचायत राज समितीचा तीन दिवसांचा दौरा असून जि.प. कामकाजांचा आढावा घेतला जाणार आहे. यासह काही तालुक्यांनाही समिती भेट देणार आहे. या तीन दिवसांच्या दौऱ्यांसाठी जि.प.कडून शनिवार, रविवारसहित पूर्णवेळ कार्यालयात थांबून तयारी करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांचे अत्यंत व्यस्त शेड्युल्ड असून प्रलंबित फाइल्स पूर्ण करण्याशिवाय अन्य कुठल्याच कामाला हात लावला जात नाही. अशा स्थितीत विविध सभांमध्ये सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून वारंवार नाराजी व्यक्त होत असतानाच आता सोमवारी २७ रोजी पंचायत राज समिती अनौपचारिक चर्चा करणार आहे. समितीत जिल्ह्यातील दोन आमदारांचाही समावेश आहे.
कुपोषणात १२०० ने वाढ
जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात झालेल्या नवीन सर्वेक्षणात तीव्र कुपोषित बालकांची संख्या वाढून २५०० वर गेली आहे. जुलैच्या सर्वेक्षणात ही संख्या १३०० वर होती. यात मोठी वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. यापूर्वीच्या सर्वेक्षणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय आता या वाढीव बालकांबाबत काय उपाययोजना असतील महिला व बालविकास विभागाला नव्याने नियोजन करावे लागणार आहे.