कु:हा(काकोडा), ता.मुक्ताईनगर : सरपंचपदाच्या निवडीसाठी मतदान करण्याकरिता जात असलेल्या दोघा सदस्यांना विरोधी गटाने जबरदस्तीने उचलून नेल्यामुळे चारठाणा गावात मोठा वाद निर्माण झाल्याने एकच खळबळ उडाली. चारठाणा गावात ग्रा.पं. निवडणुकीत एकूण 11 सदस्यांपैकी आठ सदस्य बिनविरोध निवडले गेले होते, तर तीन जागांसाठी मतदान झाले होते. विशेष म्हणजे ही निवडणूक भाजपाच्या दोघा गटांमध्येच झाली. सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीसाठी आधीच धुसफुस होती. एका गटाकडे सहा, तर दुस:या गटाकडे पाच सदस्यांचे संख्याबळ असल्यामुळे निवड चुरशीची होणार होती. त्यामुळे दोन्ही गटांनी आपल्यापरीने व्यूहरचना केलेली होती. शनिवारी एका गटातर्फे सरपंचपदासाठी बेलाबाई राजू पूरकर, उपसरपंचपदासाठी प्रदीप शहाबुद्दीन पवार तर दुस:या गटातर्फे सरपंच पदासाठी मंगला सुभाष सोनवणे, उपरसपंचपदासाठी लक्ष्मीबाई सूर्यकांत पाटील यांनी अर्ज दाखल केले. दुपारी दोन वाजता मतदानासाठी जात असताना सुमारे 200 लोकांच्या जमावाने धुडगूस घालत रंजिता तारीक पवार व बापू दशरथ भिल या दोघा सदस्यांना उचलून त्यांना पसार केले. त्यामुळे मतदान प्रक्रियेवेळी ग्रा.पं. कार्यालयात केवळ नऊ सदस्य उपस्थित होते. बेलाबाई राजू पूरकर व प्रदीप शहाबुद्दीन पवार यांच्या बाजूने पाच सदस्यांनी मतदान केल्याने सरपंच व उपसरपंचपदी त्यांची निवड करण्यात आली. तर मंगला सोनवणे व लक्ष्मीबाई पाटील यांना चार सदस्यांची मते मिळाल्याने त्यांना पराभूत व्हावे लागले. दरम्यान, या वेळी झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. ऐन निवड प्रक्रियेवेळी सदस्यांनाच पळविल्याचा हा प्रकार सगळ्यांनाच अचंबित करणारा आहे. एका जमावाने गावात दहशत माजवून ग्रा.पं. सदस्यांना मारहाण केली. सदस्यांना जमावाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न करणारे माजी सरपंच सूर्यकांत पाटील यांनासुद्धा मारहाण करून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकल्याचे समजते. जमावाने या वेळी चारठाण्यात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक कडूकार यांनी भेट देऊन गावात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसात अद्याप तक्रार दाखल नसल्याने कोणताच गुन्हा दाखल नव्हता़ (वार्ताहर)
चारठाण्यात सरपंच निवडीचा वाद
By admin | Updated: September 20, 2015 01:21 IST