जळगाव - कोरोना विषाणूचा प्रादुर्भांव हळूहळू कमी होत आहे. परिणामी, नवीन बाधित रुग्ण आढळून येणाऱ्याचे प्रमाणसुद्धा घटले आहे. बुधवारी जळगाव शहरात एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात केवळ नवे पाच रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या काही दिवसापूर्वी कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले होते. त्यामुळे बाधितांसह मृत्यूचे प्रमाण वाढले होते. मात्र, प्रशासनाची नाकाबंदी, बाजारपेठेत गस्त आणि कारवाई, त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या सर्वाधिक चाचण्या आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांचा कोरोनाचा आकडा शून्यावर पोहाचला आहे. त्यामध्ये जळगाव, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांचा समावेश आहे.
कोरोनामुळे मृत्यू नाही...
बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, तर ५३ जण कोरोनावर मात करीत घरी परतले आहेत. आता एकूण १८९ बाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रिकव्हरी दर ९८.०६ टक्क्यांवर
दिलासादायक बाब म्हणजे, बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर हा ९८.०६ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत १ लाख ३९ हजार ७१७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
भुसावळ, चाळीसगावात आढळले नवे रुग्ण
जळगावसह १३ तालुक्यात बुधवारी एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर भुसावळ तालुक्यात एक तर चाळीसगाव तालुक्यात चार असे एकूण पाच व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.