कजगाव, ता. भडगाव : कजगाव परिसरात चोरीचे सत्र थांबण्यास तयारच नाही. चोवीस तासात तीन मोटारसायकली व चार गायी लांबवत चोरट्यानी दहशत निर्माण केली आहे. तसेच पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण केले आहे.
येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कजगाव-चाळीसगाव या मुख्य मार्गावरील भोरटेक, ता. भडगाव येथील माजी उपसरपंच सुनील महाजन यांच्या कुलूप लावलेल्या कम्पाउंडमधून दि. ३ च्या पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान दोन गायी तसेच शेजारीच महाजन यांचे चुलत भाऊ नितीन महाजन यांच्या शेडमधून दोन गायी अशा चार गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून पोबारा केला. या अगोदर दीड ते दोन महिन्यांपूर्वीदेखील महाजन यांच्या याच शेड वरून तीन गायी चोरीस गेल्या होत्या तर दि. १ रोजी अर्जुन वाल्मीक पाटील यांची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती. मात्र पेट्रोल संपल्यामुळे ती कजगावजवळ रस्त्यात सोडत तेथून पोबारा केला होता.
चोरीचे सत्र थांबता थांबेना
कजगाव परिसरात गेल्या २० दिवसांपासून अज्ञात चोरट्यांनी चांगलेच डोके वर काढले आहे. कजगाव येथील कजगाव-भडगाव या मुख्य मार्गालगत असलेल्या राजकुवर नगरमध्ये एकाच रात्री दोन घरफोड्या तर त्यालाच लागून असलेल्या कॉलनीमध्ये एक घर फोडले. या घटनेस २४ तास उलटत नाही तोच कजगाव चाळीसगाव मार्गावरील कजगावच्या जलाराम वखारी च्या काही अंतरावर गजबजलेल्या या मार्गावर तांदूळवाडी येथील रमेश धाडीवाल या व्यापाऱ्यास दिवसाढवळ्या दोन अज्ञात व्यक्तींनी लुटले होते.
दि. २ च्या रात्री राजकुवरनगर येथून एक दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली तर काही तासातच दिवसाढवळ्या कजगाव पारोळा मार्गावरील रेल्वे गेटजवळून दिवसाढवळ्या एक दुचाकी लांबवली पुन्हा काही तासातच कजगावपासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या भोरटेक येथून चक्क चार गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. लागोपाठ होत असलेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. कजगावची एक मोटारसायकल पेट्रोल संपल्यामुळे बाळद येथे सोडून दिली होती. तेथून दुसरी मोटारसायकल या चोरट्यांनी लांबवली.
अद्याप तपास नाही
तीन घरफोड्या त्यानंतर रस्ता लूट या घटनेचा तपास लावण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही.