पातोंडा, ता.अमळनेर :
पातोंडा गावापासून एक किलोमीटर अंतरावरील मठगव्हाण रोड लगत असलेल्या ग्रामदैवत तीर्थक्षेत्र माहिजीदेवी मंदिरातून अज्ञात चोरांनी तांब्या पितळाचे भांडे वस्तू व मोठी घंटा चोरून नेल्याची घटना घडली.
याच देवी मंदिरात चोरीची ही तिसरी घटना असल्याचे समजते.
येथील तीर्थक्षेत्र श्री माहिजीदेवी मंदिरात आज दि.२२ रोजी सकाळी मंदिराचे पुजारी आर.टी. गालापुरे हे नेहमीप्रमाणे मंदिरात देवीची नित्य पूजा-अर्चा व आरती करण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना मंदिर दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. लगेच त्यांनी मंदिराच्या पदाधिकारी यांना कळविले. रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराला लावलेल्या लोखंडी चॅनल गेटचे कुलूप तोडून, देवी मंदिराच्या आत गाभाऱ्यामधील असलेला २२ किलो वजनाची मोठी पितळी घंटा, तांब्याचे फुलपात्र, पितळी पंचारती, कुलूप आदी तांब्या पितळ्याच्या वस्तू अशा अंदाजित पंधरा ते वीस हजारच्या वस्तू चोरीस गेल्याचे समजते. तसेच त्यांनी रस्त्याच्या कडेला मुंजोबा बसविलेल्या लहान मंदिरातील घंटीवरसुद्धा हात फिरवला. चोरट्यांना मौल्यवान दागदागिने न मिळाल्याने शेवटी त्यांनी घंटाच लंपास केला. गावातील लोकमान्य टिळक मित्र मंडळाने तीन वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून पितळी घंटा मंदिरास सप्रेम भेट दिला होता.त्यावर मंदिराचे नावही कोरून टाकले आहे. या अगोदर ही दोन वेळेस मंदिर व परिसरात चोरी झाली आहे. त्यावेळेस देवीचा मुकुट, पैसे व तांब्याच्या वस्तूसह आदी साहित्य लंपास करण्यात आले होते. या घटनेबाबतची माहिती ट्रस्टचे सचिव भूषण बिरारी यांनी पोलिसांना कळविली आली आहे.
गावात अशा अनेक लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. अद्याप एकाही चोरीचा तपास लागला नाही. सद्य:स्थितीत तर गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी व पोलिसांनी रात्रीची गस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
फोटो:-
देवी मंदिरात लावलेला घंटा याच कळीतून काढून चोरट्यांनी लंपास केला.