लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नॉन कोविड ओपीडी पूर्ववत सुरू झालेली असली तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचार विभागाच्या मनुष्यबळाचा मुद्दा सुटलेला नसल्याने या विभागाचे मनुष्यबळाचे टेंशन कायम आहे. या ठिकाणी केवळ एकच डॉक्टर उपलब्ध असून एकीकडे रुग्ण वाढत असताना डॉक्टर मिळत नसल्याने या ठिकाणी परिस्थिती बिकट झाली आहे.
नियमानुसार मानसोपचार विभागासाठी आता चौथी बॅच सुरू झाल्याने एक प्राध्यापक, एक सहयोगी प्राध्यापक, एक कनिष्ठ निवासी डॉक्टर व एक वरिष्ठ निवासी डॉक्टर असे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. मात्र, या ठिकाणी महाविद्यालय सुरू झाल्यापासून एकमेव डॉ. दिलीप महाजन हेच कार्यरत आहेत. त्यांच्यावर या पूर्ण विभागाचा कार्यभार असून आता लेक्चर सुरू झाल्याने ताण वाढणार आहे. त्यातच रुग्णांची संख्या मात्र, कोरोनाकाळात वाढली आहे.
डॉक्टर येईना
मानसोपचार विभागात एकही डॉक्टर मिळत नसल्याची खंत वरिष्ठांनी व्यक्त केली आहे. कोणतेच डॉक्टर या विभागात येत नसून कोणी डॉक्टर देता का डॉक्टर अशी म्हणण्याची वेळ या विभागावर आली आहे. एकमेव डॉक्टर असल्याने ते काही कारणास्तव येऊ न शकल्यास विभागच बंद ठेवावा लागत असल्याची गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या अखत्यारित हा मानसोपचार विभाग येत आहे. पदे भरण्यासंदर्भात वारंवार वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला, मात्र डॉक्टरच मिळत नसल्याचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले.