सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश विशनदास लालवाणी यांचे चित्रा चौकात विशाल इलेक्ट्रिक नावाचे होलसेल साहित्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानात भाऊ सुरेश हा देखील व्यवहार पाहतो. त्याशिवाय चारजण कामाला आहेत. शनिवार, दि. ३० जानेवारीला रात्री ९.२० दुकान बंद केल्यानंतर दिवसभरातील व्यवसायाचे १ लाख ६० हजार रुपये रोख, एटीएम कार्ड व इतर कागदपत्रे दुचाकीच्या (एम.एच.१९ सी.क्यू ७७८७) डिकीत ठेवून दुकानातील चेतन ढाके या मुलाला सोबत घेत कमलेश घरी निघाले. रस्त्यात पांडे चौकात ढाके याला उतरविल्यानंतर पुढे पंचमुखी हनुमान मंदिराजवळील शनी मंदिरात कमलेश दर्शनासाठी थांबले. जागृती हॉस्पिटलनजीक दुचाकी पार्किंग केली होती. दर्शन घेऊन परत आल्यानंतर ते सरळ घरी गेले. तेथे डिकीतून रोकड काढायला गेले असता डिकी उघडीच असल्याचे निदर्शनास आले. आतमधील रोकड असलेली पिशवी, बँकेचे एटीएम कार्ड, दुकानाच्या चाव्या व ड्रायव्हिंग लायसन्स गायब झालेले होते.
दरम्यान, रविवारी दिवसभर शोध व चौकशी केल्यानंतर कमलेश लालवाणी यांनी रविवारी रात्री जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक निरीक्षक किशोर पवार करीत आहे.