तितूरचे पुराचे पाय नागरी वस्त्यांपर्यंत पोहोचले
- जिजाबराव वाघ, चाळीसगाव
निसर्ग आपली वहिवाट कधी सोडत नाही. त्याचं नैसर्गिकपण तो जपतोचं. तथापि, अलीकडच्या काही वर्षांत हव्यासी मानवी हस्तक्षेपामुळे 'आपत्ती'चा फास सर्वत्र आवळू लागलायं. जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या आणि औरंगाबाद, धुळे, नाशिक या तीन जिल्ह्यांच्या सीमांना स्पर्श करणाऱ्या चाळीसगावात ३१ आॕॅगस्टच्या पहाटे हेच घडलं. गेल्या शतकातील सर्वाधिक मोठा पूर डोंगरी आणि तितूर नदीला आला. शहराचा बहुतांशी भाग जलमय झाला तर, ग्रामीण भागात पुराच्या थैमानाने अनेकांना बेघर करत शेतीपिकांचा चेंदामेंदा केला. पुराची भयावहता अशी की, शेती-शिवारातील मातीच वाहून गेली. आठ दिवस थेट सायकलवारीने २५० किमीचा प्रवास करत पूरग्रस्तांचे अश्रू समजून घेतले. वृत्तांकनाचा हा अनुभव खूप वेगळा ठरला.
त्याविषयी.
...........सगळ्या विश्वाला डिजिटल पाय जोडले गेल्याने संगणक आणि मोबाईलच्या स्क्रीनवरूनही जग भ्रमंती करता येते. कोरोनात तर अभासी जगाने सर्व सीमारेषा पुसून टाकल्या. 'लोकल ते ग्लोबल' हे स्वरुप मुद्रीत व टीव्ही चॕॅनेल पत्रकारितेला आले आहे म्हणूनच सायकलवरून पूरग्रस्तांचे दुःख समजून घेतांना आभाळ प्रकोपाला तोंड देणाऱ्या वेगवेगळ्या आयुष्याला जोडला गेलो. साधारणतःनैसर्गिक आरिष्ट्य कोसळले की, त्याच्या काही तासांनंतर 'आपत्ती पर्यटन' सुरू होते.
चाळीसगावही याला अपवाद ठरले नाही. त्यामुळे ज्यांच्यावर आभाळ फाटते, कोसळते ते सगळेचं त्यांना भेटी देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाकडे आशाळभूत नजरेनं न्याहळत असतात. मात्र, सायकलवरून त्यांच्यापर्यंत पोहोचलो. याचे त्यांना अप्रूप वाटले. कुतुहलापोटी आपले दुःख काही क्षणांपुरते का असेना बाजूला ठेवत ते भोवती गोळा होतं. केविलवाणी मुले तर सायकलकडे पाहून आनंदून जात. सायकलला हात लावतानाही त्यांना आनंदाच हसू फुटत असे.
३१ ऑगस्टच्या पुरानंतर ग्रामीण भागात मोठा हाहा:कार झाला. शहरातही दुकानदारांचे अपरिमित नुकसान झाले. दौऱ्याची सुरुवात वाकडी गावापासून केली. येथेच सर्वाधिक जनावरे पुराच्या वेढ्यात आल्याने दगावली. अनेकांच्या शेतीचे मातेरे झाले. शेतातील माती खरवडून निघाल्याने दगडे उरली आहे. सर्वत्र शोककळा असतानाही गावकऱ्यांनी प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता लहान-मोठ्या तीनशेहून अधिक मृत जनावरांची विल्हेवाट लावली. पुराच्या थैमानाला जीवितहानीचा जो डाग लागला, तो वाकडीतच. ६० वर्षीय महिला पुरात वाहून गेल्याने मृत झाली.
पहिल्याच दिवशी डोळ्यांतून वाहणारे पूर आणि हुंदके ऐकत होतो. पुढचे सहाही दिवस हे चित्र वेगळे नव्हते. एरव्ही नियमितपणे वापरला जाणारा 'आभाळ फाटणे' हा वाक्प्रचार किती आक्राळ-विक्राळ असू शकतो. त्याचे जिवंत चित्र अंर्तबाह्य हादरवून टाकणारे होते. बाणगाव, खेर्डे, रोकडे, पिंपरखेड, रांजणगाव, वाघडू, हातले, वाघले या गावांना कमी-अधिक पुराची झळ बसली आहे. सात दिवसांत प्रत्येक दिवशी ३० ते ४० कि.मी.चा सायकल प्रवास करून पुरग्रस्तांचे दुःख जाणता
आले.
.
चौकट
निसर्गाशी केलेली छेडछाड भोवली
गावगाड्यात पूर्वी नद्या बारमाही वाहत. एक वेगळा नूर यामुळे गावांना असायचा. तथापि, शहराला जोडून असणाऱ्या गावांमध्ये शहराचे आचार-विचार कधीच घुसले. गावाचं गावपण लुप्त झाले आहे. शहरात विकासासाठी ज्या त्याज्य बाबी आवर्जून केल्या गेल्या. त्याचीच दोरी खेडेगावांमध्ये ओढली गेली. गावांमध्ये असणा-या नदीपात्रांमध्ये अतिक्रमण करणे, नदीचे मूळ प्रवाह सोयीसाठी वळवणे, नदी खोलीकरण-स्वच्छता यांच्या नावाने बोंब आहे. ‘पूररेषा’ असते. याचा जणू विसर पडलेला. ३१ आॕॅगस्टच्या पुराने निसर्गाशी मानवाने केलेल्या छेडछाडीचा जणू सूड उगवला असेच म्हणावे लागेल. ज्या नद्या नावाला उरल्या होत्या. त्यांनीच पुराचा असा धडाका दिला की,
गावगाड्यातील तथाकथित विकासाचा बुरखाच टराटरा फाडून टाकला. विशेष म्हणजे बहुतांशी गावांमध्ये संसारपयोगी साहित्यासह वाहून गेलेली घरे ही बेघर मोलमोजुरी करणाऱ्या नागरिकांची आहे. त्यांना घरे बांधण्यासाठी ग्रामपंचायतींनी जागा दिली आहे. मात्र, या जागेची निवड कशी चुकीची होती. हे नद्यांना आलेल्या पुराने दाखवून दिले आहे.
नदीकाठची बहुतांशी घरे पुरातन वाहून गेली आहे. ज्यांची घरे पुरात स्वाहा झाली. त्यांच्याकडे फक्त अंगावरचे कपडे उरले आहे. पिंपरखेडला १६ ऊसतोड मजुरांच्या झोपड्या वाहून गेल्या. या धक्क्यातून हे मजूर अजूनही सावरू शकले नाही.
शहरातही हाच कित्ता गिरविला गेला आहे. नदीपात्राचे सुशोभीकरण करण्याच्या गोंडस नावाखाली दगड - मातीचे भराव केले गेले. जागोजागी केलेले अतिक्रमण, सोडलेले घाणी पाणी यामुळे नद्या फक्त नावाला उरल्या आहेत. पूररेषा 'अतिक्रमण रेषा' झाल्याने नदीचा श्वास कोंडला गेला. हाच श्वास मोकळा करताना डोंगरी आणि तितूरचे पुराचे पाय नागरी वस्त्यांपर्यंत पोहोचल्याने शहरवासीयांच्या काळजाचा ठोका चुकला. सायकलच्या चाकांसोबत पूरग्रस्त भागाची केलेली सफर आयुष्याच्या ग्रंथात एक वेगळे पान जोडणारी ठरली.