पातोंडा, ता. अमळनेर :
राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांवरील नाशिक, पुणे, अमरावती, मुंबई व औरंगाबाद विभागातील विनावेतन शिक्षकांनी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे २ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदावरील शिक्षक गेल्या दहा ते बारा वर्षांपासून अध्यापनाचे पवित्र कार्य विनावेतन करीत आहेत. अलीकडेच स्वातंत्र्यदिनीही या शिक्षकांनी वाढीव पदांच्या मान्यतेसाठी आत्मक्लेश आंदोलन केले होते. यापूर्वीही अनेकदा आझाद मैदान मुंबई, पुणे शिक्षण संचालक ऑफिस, तसेच विविध उपसंचालक कार्यालयांसमोरही अनेक वेळा आंदोलने केली आहेत; परंतु आजपर्यंत या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही.
वारंवार माहिती मागविणे, प्राप्त माहितीमध्ये त्रुटी काढणे व मान्यता व वेतन न देणे या सगळ्या प्रकारामुळे विनावेतन काम करणारे शिक्षक मेटाकुटीस आले असून, त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. परिणामी सदर वाढीव प्रस्तावित पदांच्या बाबतीत समस्त अन्यायग्रस्त शिक्षकांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही राज्यातील विनावेतन काम करणारे पीडित शिक्षक शिक्षण संचालक, पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करीत आहोत असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.