संजय पाटील/ ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.23 - महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नव्या अभ्यासक्रमातील पुस्तकांमध्ये विद्याथ्र्यांना तसेच शिक्षकांना अधिक अभ्यास करता यावा म्हणून ‘क्यू आर’ कोड प्रसिद्ध केला आहे. मात्र ‘क्यू आर’ कोड स्कॅन केल्यानंतर देखील कुठलीही लिंक ओपन होत नसल्याने शिक्षकांसह विद्याथ्र्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
इयता नववीची पुस्तके नव्या अभ्यासक्रमासह छापण्यात आली आहेत. सर्वत्र ऑनलाईन कामकाज सुरू झाल्याने विद्यार्थी व शिक्षकांना संबंधित घटकांवर अधिक ज्ञान मिळावे म्हणून पुस्तकांवर ‘क्यू आर’ कोड छापण्याचा नावीन्य पूर्ण प्रयोग मंडळाने केला.परंतु पुस्तकांच्या पहिल्याच पानावर ‘क्यू आर’ कोड छापून त्या शेजारी ‘स्मार्ट फोन’ च्या साहाय्याने कोड स्कॅन केल्यावर शिकण्यासाठी व शिकवण्या साठी विविध लिंक अथवा ‘यूआरएल’ ओपन होतील, आशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष काही शिक्षकांनी आणि विद्याथ्र्यांनी असे कोड स्कॅन करून पाहिल्यानंतर फक्त पुस्तकाचे पाहिले पान व विषयाचे नाव दिसते. मात्र कोणतीही लिंक अथवा यू आर एल दिसत नाही.
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक डी.ए. धनगर यांनी प्रात्यक्षिक करून पाहिले असता कोणतीही लिंक मिळाली नाही. याबाबत त्यांनी मंडळातील अधिकृत सूत्रांशी याबाबत संपर्क साधला असता अजून लिंक ओपन होत नसल्याचे कबुली दिली आहे. मात्र लवकरच विद्याथ्र्यांसाठी लिंक व यू आर एल उपलब्ध करून दिल्या जातील असे सांगण्यात आले.
काय आहे ‘क्यू आर’ कोड
‘क्यू आर’ म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. म्हणजे ऑफ लाईन जगाला ऑनलाईन जोडण्यासाठी अतिशय उपयुक्त माध्यम म्हणून याचा उपयोग केला जातो. क्षणाचा ही विलंब न लागता अपेक्षित ज्ञान मिळविता येते.