अमळनेर : घरासमोर शिट्ट्या का वाजवतात व गाणी का म्हणतात, याचा जाब विचारायला गेलेल्या तिघांना दहा जणांनी कुऱ्हाड व लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याची घटना २३ व २४ रोजी ताडेपुरा भागात हिंदुस्थान पावबेकरीजवळ घडली.
टाकरखेडा रोडवरील ताडेपुरा भागात राहणाऱ्या सुमनबाई पंडित साळुंखे यांचा मुलगा मिलिटरीमध्ये असून, तो २३ रोजी रजेवर घरी भेटायला आला. याच भागातील तरुण सुमनबाईच्या घरासमोर येऊन शिट्ट्या वाजवतात व मोठमोठ्याने गाणी म्हणतात, अशी तक्रार तिने मुलाला केल्यावर २४ रोजी मुलगा कैलास साळुंखे त्यांना जाब विचारायला गेले असता राजाराम शांताराम पारधी, भिकन पारधी, अविनाश पारधी, चांद्रसिंग राजेंद्र पारधी, विक्की राजेंद्र पारधी, अभिजित राजाराम पारधी, दिनेश देविदास पारधी, करण देविदास पारधी, अर्जुन देविदास पारधी, प्रमिला राजाराम पारधी यांनी सर्वांनी त्याला पायावर काठीने मारहाण केली तर, सुमंनबाईला पायावर सळईने व डोक्यावर कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले.
पोलिसात तक्रार केली तर पुन्हा मारहाण करू, अशी धमकी दिली. सुमनबाईच्या सुनेलाही मारहाण केली. दवाखान्यात उपचार घेऊन आल्यानंतर फिर्याद दिल्याने दहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अद्याप अटक नाही. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.