चाळीसगाव : गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही नव्या शैक्षणिक वर्षावर कोरोनाचे सावट गडद असून, मंगळवारपासून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचे निर्देश दिले गेले आहे. सोमवारी मात्र जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांवर शिक्षकांनी हजेरी लावत पटनोंदणी सप्ताहाला सुरुवात केली. काही शाळांमध्ये परिसर स्वच्छताही करण्यात आली. मंगळवारी जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना शंभर टक्के उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी शाळांमध्ये शिक्षकांची गजबज दिसून आली. माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहण्याबाबत स्पष्ट सूचना नाही.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात सार्वजनिक टाळेबंदीनंतर शाळाही लॉक झाल्या. प्राथमिक शाळावगळता अनलॉकमध्ये नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले. तथापि, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररुप धारण केल्यानंतर शिक्षणवारीला पुन्हा ब्रेक लागला. उन्हाळी सुटी १४ रोजी संपली असून, मंगळवारी नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. कोरोनामुळे मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षावरही अनिश्चिततेचे सावट आहे. अशाही स्थितीत सोमवारी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांच्या सूचनेनुसार शिक्षकांनी हजेरी लावली. यामुळे बहुतांश शाळांचे दरवाजे किलकिले झाल्याचे दिसून आले. शिक्षकांनी पटनोंदणी सप्ताहांतर्गत शाळेत दाखलयोग्य वयाच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणही सुरू केले आहे. ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीनुसार शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची तयारी शिक्षण विभागासह शिक्षकांनीदेखील केली आहे.
चौकट
आज होणार फुले देऊन स्वागत
सहा वर्षे पूर्ण करणाऱ्या मुलांसाठी पटनोंदणी सप्ताह सोमवारपासून सुरू झाला आहे. या सप्ताहांतर्गत शाळेत दाखलयोग्य वयाच्या मुलांचा शोध घेऊन त्यांची पटनोंदणी केली जाणार आहे. सोमवारी काही शाळांनी हे सर्वेक्षण केले. यानुसार मंगळवारी इयत्ता पहिलीत नाव दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत करण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण विभागाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
१...काही शाळांमधील शिक्षकांनी गेल्या १४ महिन्यांपासून बंद असणाऱ्या शाळांसह परिसर स्वच्छता केली, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिंदी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पटनोंदणी सप्ताहाला सुरुवात केल्याचेही त्यांनी सांगितले.
.............
चौकट
विद्यार्थ्यांशिवाय उघडणार ३३५ शाळा
चाळीसगाव तालुक्यात जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या १९०, तर १४५ शाळा खासगी व्यवस्थापनाच्या आहेत. एकूण ३३५ शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शाळांच्या घंटा वाजण्याची प्रतिक्षा आहे. शाळा आणि विद्यार्थी यांच्यामध्ये ‘कोरोना’चा अडसर आहे.
मंगळवारी शाळेच्या पहिल्या दिवशी जे विद्यार्थी स्वखुशीने शाळेत उपस्थित राहतील, त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोनची उपलब्धता नाही, त्यांना ऑफलाईन पद्धतीने शिकवले जाईल.
.........
चौकट
माध्यमिक शाळांबाबत सूचना नाहीत
नव्या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शाळा सुरू करण्याबाबत स्पष्ट सूचना नाहीत. शिक्षण उपसंचालकांनी काढलेल्या पत्रानुसार ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केली जाणार आहे. रविवारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी नव्या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी आज मंगळवारी शाळेत उपस्थित राहायचे की नाही? याबाबत काहीसे गोंधळाचे वातावरण आहे.
.........
इन् फो
सोमवारी मुख्याध्यापकांनी शिक्षकांना शाळांमध्ये बोलावून पटनोंदणीला सुरुवात केली. या सप्ताहांतर्गत इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबची फुले देऊन मंगळवारी स्वागत करण्याच्या सूचना दिल्या. ऑनलाईन शिक्षणाला नव्या शैक्षणिक वर्षात आजपासून सुरुवात होईल. शिक्षक शाळांमध्ये शंभर टक्के उपस्थित असतील.
-विलास भोई
प्र. गटशिक्षणाधिकारी, चाळीसगाव.
.............
इन फो
जिल्ह्यात ७५०हून अधिक माध्यमिक शाळा आहेत. शिक्षण उपसंचालकांच्या ३० एप्रिलच्या पत्रानुसार मंगळवारपासून ऑनलाईन शिक्षण सुरू होत आहे. असेच पत्र माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे काढले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १५ ते २० हजार इतकी आहे.
- जे. के. पाटील
अध्यक्ष, जिल्हा मुख्याध्यापक संघ
===Photopath===
140621\14jal_1_14062021_12.jpg
===Caption===
तळेगाव तांडा येथे सोमवारी पटनोंदणी सप्ताहातर्गत इयत्ता पहिलीत दाखल होऊ शकणा-या विद्यार्थ्यांचे घरोघरी सर्वेक्षण करताना जि.प.शाळेतील शिक्षक. (छाया : जिजाबराव वाघ