जळगाव : मामाच्या गावी आलेल्या नंदिनी कडू तायडे (रा.१८ रा.अट्रावल ता.यावल) या तरुणीने पहाटेच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघड झाली. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी ही अट्रावल येथे आई वडिलांसह वास्तव्यास होती. बुधवारी सायंकाळी जळगाव तालुक्यातील रिधूर येथे मामा मनोहर कोळी यांच्या ती घरी आली होती. रात्री जेवणानंतर सर्व जण झोपले यानंतर पहाटे साडे तीन वाजता तिने छताला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. मनोहर कोळी यांना पहाटे जाग आली असता नंदिनी हिने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती कळाल्यावर पोलीस पाटील प्रमोद निंबा पाटील यांनी घटनास्थळ गाठले. तसेच या प्रकाराची माहिती तालुका पोलिसांना कळविली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे, पोलीस नाईक, दिनेश पाटील यांनी घटनास्थळी जावून पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नागरिकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, नंदिनी हिने आत्महत्या का केली हे कळू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस पाटील प्रमोद पाटील यांच्या खबरीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.