जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जन्मतः च कमी वजन असलेल्या बाळाला ५६ दिवसांच्या उपचारानंतर वाचवण्यात यश आले. हे बाळ बरे झाल्यावर सोमवारी त्याला घरी सोडण्यात आले.
खडकेसीम ता. एरंडोल येथील जोगी या दाम्पत्याला जानेवारी महिन्यात मुलगी झाली. जन्मतःच बाळाचे वजन ८३० ग्रॅम होते. त्यामुळे बाळाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ४ जानेवारीला नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान बाळाला २ वेळा रक्त चढवावे लागले.
बाळाच्या आईला आणि नातेवाईकांना कांगारू मदर केअरविषयी आरोग्य शिक्षण देण्यात आले. त्यानुसार तब्बल ५६ दिवसांनी बाळाचे वजन वाढून १ किलो ३०० ग्राम झाले. यासाठी वैद्यकीय पथकाने अथक परिश्रम करून बाळाला जीवदान दिले. बाळावर उपचारासाठी नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या डॉ. वृषाली सरोदे, डॉ. हितेंद्र भोळे, डॉ. शैलजा चव्हाण, डॉ. अखिलेश खिलवाडे यांनी परिश्रम घेतले.