रावेर : तालुक्यातील मोहमांडली येथील आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता ५ वीतील विद्यार्थी सुनील ग्यानसिंग पावरा (१२), रा. साग्यादेव, ता यावल हा कोरोनाच्या निर्बंधांमुळे गत दोन वर्षांपासून घरीच वास्तव्यास असताना १६ जुलै रोजी त्याचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी सादर केला आहे. सदर विद्यार्थ्याचा अकाली मृत्यू झाल्याने साशंकता निर्माण झाली होती. त्या अनुषंगाने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील यांनी रावेर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन हे बालरोग व शिशूरोगतज्ज्ञ असल्याने त्यांना वैद्यकीय चौकशीसाठी नियुक्त केले होते. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी मयत विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याच्या आजारासंबंधी स्थानिक चौकशी केली असता सदर विद्यार्थी हा क्षयरोगाने ग्रस्त असल्याने तो जामनेर तालुक्यातील पहूर येथील खासगी रुग्णालयातून क्षयरोगावर औषधोपचार घेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदर विद्यार्थ्याचा कुपोषण वा सिकलसेलमुळे तर मृत्यू झाला नाही ना, या शंकाकुशंकांवर पडदा पडला आहे.
मोहमांडली आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा क्षयरोगाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST