धरणगाव : आठ दिवसांपासून अचानक पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप पिकांना वाचवण्यासाठी आता पावसाळ्यात तुषार व ठिबकच्या साह्याने पाणी देण्याची वेळ ओढवली आहे. अनेकांनी पाणी देण्यास सुरुवात केली.
धरणगावसह परिसरात १० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे सोयाबीन, मका, उडीद, मूग, मटकी ही पिके जगवण्यासाठी शेतकरी ठिबक व तुषार सिंचनाद्वारे पाणी देत आहेत; परंतु अनेकांकडे पाण्याची सुविधा नसल्याने दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कारण लागवड खर्च मोठ्या प्रमाणात करून खरीप पेरणी पूर्ण केली. आता पाऊस थांबल्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. आता उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, कोवळी पिके माना टाकत आहेत.