लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयात तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. यावेळी उमेदवार आत असले तरी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची केंद्राबाहेर तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी उसळली होती. कोर्ट चौक ते शाहू महाराज रुग्णालयापर्यंत पूर्ण रस्ता बंद होता. याठिकाणची वाहतूक दुसरीकडून वळविण्यात आली होती.
सकाळी साडे नऊ वाजल्यापासूनच केंद्राबाहेर गर्दी जमायला सुरूवात झाली होती. महाविद्यालयाच्या प्रमुख गेटवर पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवून ठेवले होते. उमेदवार व प्रतिनिधींना केवळ आत सोडल जात होते. महाविद्यालयाच्या प्रथम गेटच्या बाहेरच प्रचंड गर्दी उसळली होती. मात्र, दोनही गेटच्या काही अंतरावर बॅरिकेट्स लावून उमेदवार व प्रतिनिधींचे ओळखपत्र बघूनच आतमध्ये प्रवेश दिला जात होता. यामुळे जिल्हा न्यायालयासमोरच्या दुभाजकावर उभे राहून तरूण निकालाची वाट बघत होते. या संपूर्ण परिसराला गर्दीने वेढले होते. निकाल लागल्यानंतर उमेदवार दुसऱ्या गेटने बाहेर येत होते आणि विजयाचे चिन्ह दाखविताच एकच जल्लोष होत होता. काहींनी गुलाल उधळला, तर काही उमेदवारांचे हार टाकून, खांद्यावर उचलून जल्लोष करण्यात आला. या परिसरातील मेडिकलवगळता अन्य दुकाने बंदच होती. अनेकांची मेडिकलवर जाण्यासाठीही तारांबळ उडाली. अनेक विद्यार्थ्यांना मार्ग बदलून परत जावे लागले.