लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली असून, मनपाकडून दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याने, पावसाळ्यातील काही महिने ही कामे बंद करून, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे, तसेच या मागणीसाठी मनसेकडून शुक्रवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा संघटक राजेंद्र निकम, राजू बाविस्कर, महेश माळी, गणेश नेरकर, गोविंद जाधव, विशाल कुमावत, नीलेश अजमेरा, संतोष सुरवाडे, रमेश भोई, नीलेश खैरनार, बळीराम पाटील, ॲड.दिनेश चव्हाण, मंगेश भावे आदी उपस्थित होते. शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, कासमवाडी भागातील एका नागरिकाचा याच रस्त्यांमुळे बळी गेला. महापालिकेकडून अनेक भागातील रस्तेच आतापर्यंत तयार करण्यात आले नाहीत, तर काही ठिकाणचे रस्ते अमृत योजनेमुळे खराब झाले आहेत. मनपाने पावसाळ्यात रस्त्यांमुळे होणारी गैरसोय पाहता, अमृत अंतर्गत सुरू असलेले खोदकाम थांबविण्याची मागणी केली आहे, तसेच हे काम थांबवून तत्काळ दुरुस्तीचे कामे सुरू करण्याची मागणी केली आहे. मनपाने हे काम थांबविले नाही, तर मनसेकडून शहरातील अमृतची कामे थांबविण्याचा इशारा या निवेदनामार्फत देण्यात आला आहे.